The gazette of the newly elected corporators has been published
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची अधिकृत घोषणा करणारे राजपत्र शासनाने प्रसिद्ध केल्यानंतर शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. राजपत्र प्रसिद्धीसोबतच गट नोंदणीबाबत शासनाने राजकीय पक्षांना निर्देश दिल्याने, प्रत्येक पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचे सत्र सुरू झाले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी शहरातील २९ प्रभागातील ११५ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. निकालानंतर चार दिवसांनी म्हणजेच मंगळवारी (दि. २०) शासनाने अधिकृत राजपत्र प्रसिद्ध करून त्यामध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची नावे तसेच ते कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडून आले आहेत, याची माहिती सार्वजनिक केली असून हे राजपत्र सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुले करण्यात आले आहे. दरम्यान, राजपत्र प्रसिद्धीबरोबरच शासनाने गट नोंदणीसंदर्भात स्वतंत्र पत्र जारी केले आहे.
महापालिकेत ज्या-ज्या पक्षांचे नगर-सेवक निवडून आले आहेत, त्या पक्षांना विभागीय आयुक्तांकडे आपल्या नगर-सेवकांचा अधिकृत गट नोंदवणे बंधनकारक राहणार आहे. यासाठी संबंधित पक्षाला गटनेत्याची नियुक्ती करून, ठराविक प्रक्रियेनुसार गट नोंदणी पूर्ण करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून पुढील ३० दिवसांच्या आत गट नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीनंतरच प्रत्यक्षात गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वांचे लक्ष आता महापौर निवडणुकीकडे लागले आहे.
प्रत्येक पक्षाकडून बैठकांवर जोर
जोपर्यंत महापौर निवड होत नाही, तोपर्यंत प्रत्येक पक्षाकडून अंतर्गत चर्चा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि रणनीती आखण्याचे सत्र सुरूच राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून महापालिकेतील सत्तास्थापनेच्या दृष्टीने गट नोंदणी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवस शहराच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.