

A crowd of candidates gathered in Kannad taluka to file their applications
कन्नड, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपविभागीय कार्यालयासमोर गाव पुढाऱ्याची मोठी गर्दी बघायला मिळाली.
तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटांसाठी ११० अर्ज तर १६ पंचायत समिती गणांसाठी २१८ अर्ज प्राप्त झाले आहेत. नामनिर्देशन प्रक्रियेच्या शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारांची विशेष गर्दी दिसून आली.
शेवटच्या दिवशी सर्वाधिक अर्ज
नामनिर्देशन प्रक्रियेच्या २१ जानेवारी रोजीच सर्वाधिक अर्ज दाखल झाले. जिल्हा परिषद गटांसाठी व पंचायत समिती गणांसाठी एकूण ३२८ अर्ज प्राप्त झाल्याने उपविभागीय कार्यालयात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
एकूणच कन्नड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निवडणूक लढत अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांत रंगत वाढणार आहे.
जिल्हा परिषद गटनिहाय अर्ज
जिल्हा परिषदेंतर्गत सुरुवातीला नागद गटात सर्वाधिक २३ अर्ज प्राप्त झाले असून, त्याखालोखाल चिंचोली लिम्बाजी गटात २०, करंजखेडा गटात १९, पिशोर गटात २१, हतनूर गटात १५, कुंजखेडा गटात १२, जेहूर गटात ११ आणि देवगाव रंगारी गटात १२ अर्ज दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.
पंचायत समिती गणनिहाय अर्ज
पंचायत समिती अंतर्गत औराळा गणात सर्वाधिक २१ अर्ज, तसेच देवगाव रंगारी गणात २१, नागद गणात २०, अधानेर गणात १८, करंजखेडा गणात १८, कुंजखेडा गणात २०, निंभोरा गणात १७, हतनूर गणात १६, चिंचोली लिम्बाजी गणात १६, तर जेहूर गणात सर्वात कमी ६ अर्ज दाखल झाले आहेत.