The gang stormed into the lawyer's house
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घर खाली करण्याच्या कारणावरून जमावाने एका वकिलाच्या घरात घुसून राडा केला. हा प्रकार मंगळवारी (दि.१) सकाळी १०:२२ ते दुपारी ३:४० या दरम्यान रामेश्वरपूरम, जटवाडा रोडवरील होनाजी नगर भागात घडला. या गुंडांनी वकिलाच्या पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्या लहान मुलांचे अपहरण करण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुजाजी उत्तम पोफळे (रा. बजरंग चौक, सिडको), मँडी आणि त्यांच्यासोबतचे अनोळखी ५ पेक्षा जास्त पुरुष व ५ पेक्षा जास्त महिला अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरपुरम, होनाजी नगर, जटवाडा रोड येथे राहणारे ५० वर्षीय वकील यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) सकाळी १०.२२ आणि दुपारी ३.२८ ते ३.४० वाजेच्या दरम्यान घर खाली करण्याच्या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्या घरात बेकायदेशीररीत्या प्रवेश केला.
आरोपींनी वकिलाच्या पत्नीला मारहाण केली. तसेच, आरोपी मंडी याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा हाताने जोरात दाबला. यामुळे त्यांच्या गळ्याभोवती सूज येऊन गंभीर दुखापत झाली. या टोळक्याने दुपारी वकिलाच्या मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच, फिर्यादी यांना उद्देशून, जातीवाचक शिवीगाळ करत मी पाहून घेतो, अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर वकिलांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख हे करत आहेत.