The fragrance of wildflowers wafts through the Gautala Sanctuary
निसर्गाच्या कुशीत दरवळे मृदगंधी, धबधब्याच्या नादात फुलती सौंदर्यबिंदी।
कन्नड, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील निसगनि नटलेल्या गौताळा अभयारण्य श्रावणात हिर-वेगार झाले असून, रानफुले फुलली असून, झालेल्या पावसाने यातील धबधबे खळखळून वाहत असल्याने अभयारण्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.
गौताळा अभयारण्यात वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात म्हणजेच पावसाळ्याच्या मध्यावधीपासून विविध सुंदर रानफुले व वर्षाऋतूत विशिष्ट वनस्पती दिसतात. वनस्पतीतज्ज्ञांची मते येथे कारवी, जांभळट, दीपकाडी, जलवनस्पती, भिंडूनी, इम्पेशियन्स, साधारण लिली, कंदिलपुष्प, ऑर्किडस आदी सफेद, गुलाबी, लाल, जांभळा इत्यादी रंगाची रंगीबेरंगी फुले फुलून त्यांचा मनमोहक सुगंध दरवळत आहे.
तालुक्यात २५ ते २६ जुलैदरम्यान झालेल्या पावसामुळे अभयारण्यातील छोटे मोठे तलाव भरून धबधबे ओसंडून वाहत आहेत. यात सीता खोरी धबधब्याचे पाणी उंचीवरून कोसळत असल्याने मनमोहक दृश्य दिसत असल्यामुळे अभयारण्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. गौताळा अभयारण्याची स्थापना १९८६ मध्ये सुरक्षित संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित झाले असून, सुमारे २६,०६१ हेक्टर (६४,००० एकर) क्षेत्रात व्यापला आहे. सातमाळा व अजिंठा डोंगरमाळ मध्ये स्थित असून, छत्रपती संभाजीनगर व चाळीसगाव जिल्ह्यांच्या सीमेवर हे अभयारण्य आहे.
बिबट्या, वाघ, अस्वल, नीलगाय, चिंकारा, रानमांजर, कळविट, हरीण, सायाळ आदी विविध प्राणी येथे आहेत. तसेच विविध जातींचे २३०-२४० पेक्षा जास्त पक्षी प्रजाती तर दुर्मिळ जातींचा समावेश आहे. ५० पेक्षा जास्त औषधी वनस्पती या अभयारण्यात आढळतात, ज्यांचा आदिवासी समुदाय वर्षानुवर्षांपासून उपयोग करतात.
प्राण्यांचा प्रजनन कालावधीत (पक्षी व प्राण्यांचे) शांत आणि स्फूर्तिदायी वातावरण राहण्यासाठी तसेच पावसात पुराचा धोका टाळण्यासाठी गौताळा अभयारण्य हे दरवर्षी १ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवल्या जात असल्याची माहिती वन्यजीव विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे सध्या तरी पर्यटकांना अभयारण्यातील सौंदर्य बघता येणार नाही.