राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर File Photo
छत्रपती संभाजीनगर

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महायुतीची वाट न पाहता स्वबळाचे फुंकले रणशिंग : १८ प्रभागांतील नावे घोषित

पुढारी वृत्तसेवा

The first list of candidates has been announced by the NCP Ajit Pawar group

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असून, या पार्श्वभूमीवर महायुतीची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) स्वबळाचे रणशिंग फुंकत रविवारी (दि.२८) प्रभागनिहाय पहिली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १८ उमेदवारांचा समावेश असून, अनुभवी चेहऱ्यांसोबतच नव्या नेतृत्वालाही संधी देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाला युतीत स्थान मिळण्याची प्रतीक्षा होती, मात्र शिवसेना (शिंदे गट) व भाजपमध्येच काही जागांवरून घोडे अडले असून, युती होईलच याची शाश्वती नाही. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने अजित पवार गटाने रविवारी १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

दरम्यान, राष्ट्रवादीची पहिली यादी घोषित झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, इतर पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे. जाहीर झालेल्या यादीत पक्षाने महिला, अल्पसंख्याक, ओबीसी व सर्वसामान्य घटकांचे प्रतिनिधित्व साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे काही प्रभागांमध्ये एकाहून अधिक उमेदवारांची नावे जाहीर करून राष्ट्रवादीने संभाव्य राजकीय समीकरणे व अंतर्गत रणनीती स्पष्ट केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

राजकीय गणिते आणि पुढील वाटचाल

जिल्हाध्यक्ष आ. सतीश चव्हाण, शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्व लढवल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीत शहराचे प्रश्न, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, आरोग्य व शिक्षण हे मुद्दे केंद्रस्थानी राहणार असून या पहिल्या यादीतून पक्षाने संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. दरम्यान, उर्वरित प्रभागांसाठी लवकरच दुसरी यादी जाहीर होणार असल्याचे संकेत पक्ष सूत्रांकडून मिळत असून, आगामी काळात शहरातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.

मजबूत संघटनात्मक बांधणीवर भर

या पहिल्या यादीत डॉक्टर, महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच अनुभवी चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, सर्वच प्रभागांमध्ये संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. ही यादी म्हणजे पक्षाच्या निवडणूक रणनितीची पहिली पायरी मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT