The excitement of the Bail Pola festival in Devgaon Rangari area of Kannada taluka
देवगाव रंगारी, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी परिसरात बैल पोळा सणाच्या पूर्वसंध्येला शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांची खादेमळणी करून त्यांची विशेष निगा राखली. शेतकरीवर्गासाठी हा सण म्हणजे श्रमाचे ओझे वाहणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याने गावोगावी शेतकरी मोठ्या उत्साहात तयारी करताना दिसत आहेत.
शेतकरी सकाळपासूनच आपल्या बैलांना स्वच्छ आंघोळ घालून, अंगाला तेल चोळून व खांदे मळणी करून सजवू लागले. शिंगांना आकर्षक रंग लावून, त्यांना फुलांच्या माळा, झुलपे व शोभेच्या वस्तूंनी सजविण्यात आले. अंगणात मुलांचे आनंदाने उड्या मारणे, महिलांचे सजावटीत सहभाग घेणे आणि तरुणांचा उत्साह पाहून पोळ्याचा जल्लोष अधिकच वाढला.
सणाचे पारंपरिक विधी मिरवणूक काढण्यात येणार असून, ढोल सणाच्या दिवशी बैलांची पारंपरिक ताशांच्या गजरात व लेझीमच्या तालावर गावकरी सामील होणार आहेत. मिरवणुकीनंतर बैलांचे पूजन करून त्यांना ओटी दिली जाईल. बैलांना नैवेद्य अर्पण करून गोडधोड पदार्थ तसेच खास जेवण देण्याची प्रथा यावेळी पाळली जाणार आहे.
गावात सर्वत्र पोळ्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बैलांची सजावट, खांदे मळणी, पूजन विधी आणि मिरवणुकीमुळे गावात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य खुलले असून, पारंपरिक संस्कृतीचे जतन या सणामुळे होत असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
गावोगावी शेतकरी आपापल्या बैलांची जणू कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सेवा करताना दिसतात. बैलांशिवाय शेतीची कल्पना करणे कठीण आहे. वर्षभर शेतकरी बांधवांसोबत श्रम करणाऱ्या बैलांचे हे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे पोळा. बैल हे खरे शेतकऱ्यांचे जीवनसाथी आहेत, असे स्थानिक शेतकरी प्रतापसिंग राजपुत यांनी सांगितले.