Gautala Sanctuary : कन्नड तालुक्यात पावसाने गौताळा बहरला file photo
छत्रपती संभाजीनगर

Gautala Sanctuary : कन्नड तालुक्यात पावसाने गौताळा बहरला

प्रसिद्ध सीताखोरी धबधबा प्रवाहित, १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशास बंदी

पुढारी वृत्तसेवा

The entire area of ​​the Gautala Sanctuary has turned lush green due to the ongoing rainfall

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गौताळा अभयारण्य परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून निसर्गसौंदर्य खुलून आले आहे. सततच्या पावसामुळे अभयारण्यातील लहान-मोठे धबधबे प्रवाहित झाले असून, प्रसिद्ध सीताखोरी धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे.

डोंगररांगा, घनदाट वनराई, धुक्याची चादर आणि उंच कड्यावरून कोसळणारा पांढरेशुभ्र सीताखोरी धबधबा यामुळे गौताळा अभयारण्य परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. पावसाळ्यामुळे परिसरातील झाडे, वेली आणि वनसंपदा नवचैतन्याने बहरली असून, खळखळणारे पाण्याचे प्रवाह आणि धुक्याने नटलेले डोंगर परिसराला मनमोहक रूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, पावसाळ्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने गौताळा अभयारण्यात १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

त्यामुळे नागरिकांनी व पर्यटकांनी अभयारण्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये तसेच वनविभागाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसामुळे गौताळा अभयारण्यातील नैसर्गिक जलस्रोत आणि धबधबे पुन्हा प्रवाहित झाले असून, संपूर्ण परिसर पावसाळी वातावरणाने बहरून गेला आहे.

वन्यप्राण्यांना दिलासा

यावर्षी मान्सून जवळपास एक महिना उशिराने दाखल झाल्याने जूनअखेरपर्यंत तालुक्यासह गौताळा अभयारण्य परिसरात कडक उन्हाचा तडाखा कायम होता. तीव्र उष्णतेमुळे अभयारण्यातील अनेक वृक्षांची मोठ्या प्रमाणावर पानगळ झाली होती. त्यामुळे वन्यप्राण्यांना सावलीसाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, पावसामुळे अभयारण्याला पुन्हा हिरवाईची झळाळी प्राप्त झाली आहे. डोंगर, दऱ्या, ओढे आणि धबधबे प्रवाहित झाल्याने संपूर्ण गौताळा परिसर निसर्गरम्य झाला असून वन्यजीवांसाठीही दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT