The construction of the bridge over the Narali River has been stalled
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यातील घोडेगाव ते डोमेगाव या मुख्य रस्त्यावरील नारळी नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम गेल्या चार महिन्यांपासून बंद पडल्याने नागरिक, शेतकरी व वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या पुलाचे बांधकाम धिरज पवार कंपनीमार्फत सुमारे एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र आजतागायत पुलाचे काम अर्धवट अवस्थेतच असून गेल्या चार महिन्यांपासून ते पूर्णपणे बंद आहे. हा रस्ता घोडेगाव व डोमेगाव परिसरातील नागरिकांसाठी ये-जा करण्याचा एकमेव मार्ग असल्याने पुलाचे काम रखडल्यामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी, नागरिकांना गावाशी संपर्क ठेवण्यासाठी तसेच शाळकरी मुलांना शिक्षणासाठी याच रस्त्यावर अवलंबून राहावे लागते. पावसाळ्यात नारळी नदीला पूर आल्याने अनेक वेळा गावाचा संपर्क तुटला होता.
सध्या देखील अर्धवट पुलामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत असून, अपघाताची भीती कायम आहे. पुलाचे काम तात्काळ सुरू करावे, तसेच मंजूर अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. मात्र त्याची दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे बंद पडलेल्या पुलाच्या ठिकाणीच ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा माजी सरपंचांसह ग्रामस्थांनी दिला आहे.
घोडेगाव-डोमेगाव रस्त्यावरील नारळी नदी पुलाच्या कामास प्रारंभ होऊन एक वर्ष होत आले आहे. सध्या हे काम चार महिन्यांपासून बंद आहे. यामुळे नागरिक, शेतकरी, वाहनधारक व शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदरचे बंद पडलेले पुलाचे काम तात्काळ सुरू करून ते अंदाजपत्रकानुसार पूर्ण करावे, अन्यथा पुलाच्या ठिकाणीच ग्रामस्थांसह उपोषण सुरू करणार.श्रीराम साळुंके, माजी सरपंच, घोडेगाव