ST Bus Locations : घरबसल्या एसटीच्या लोकेशनचा घोळ संपेना file photo
छत्रपती संभाजीनगर

ST Bus Locations : घरबसल्या एसटीच्या लोकेशनचा घोळ संपेना

अनेक बस सेवतून बाहेर : व्हीटीएस बसवण्याचा खर्च वाया

पुढारी वृत्तसेवा

The confusion regarding ST bus locations persists, even when checking from home

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन मिळण्यासाठी प्रत्येक बसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. अद्यापही ही यंत्रणा प्रवाशांसाठी खुली करण्यात आली नाही. अशात ही यंत्रणा बसवलेल्या अनेक बस सेवेतून बाहेर पडल्याने या बसेसना ही यंत्रणा बसवण्याचा खर्च पाण्यात गेला आहे. गेल्या आठ वर्षांपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा घोळ संपत नसल्याने प्रवाशांना या सुविधेसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल याचे उत्तर येथील अधिकाऱ्यांकडे नाही.

एसटीच्या या कार्यपद्धतीवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळ नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकदा बस दिलेल्या वेळेत प्लॅटफॉर्मवर दिसत नाही. अशा वेळी ती बस कुठे असेल याची माहिती एसटी अधिकाऱ्यांकडून किंवा संबंधित चालकांकडून घ्यावी लागते.

आता व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टममुळे हे काम सोपे होणार आहे. या यंत्रणेमुळे बस कोठे आहे आणि ती किती वेळात प्रवाशांपर्यंत पोहोचू शकेल याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. यासाठी एसटीने एमएसआरटीसी कॉम्यूटर अॅप विकसित केले आहे. परंतु हे अप अद्यापही अपडेटच्या नावाखाली लॉन्च न केल्याने या सुविधेपासून प्रवासी दूरच आहेत. दुसरीकडे खासगी बसचालक मात्र लोकेशनसह प्रवाशांना वेळोवेळी फोन मॅसेजद्वारे अपडेट माहिती देत आहेत.

४५० बसना बसवली सिस्टम

संभाजीनगर विभागातील लालपरीसह इतर सुमारे ४५० बसना ही सिस्टम बसवली आहे. दरम्यान, यातील अनेक बस वयोमान संपल्याने सेवेतून बाहेर पडल्या आहेत. यामुळे या बसना ही यंत्रणा बसवण्यासाठी लागलेला खर्च पाण्यात गेला आहे. हा खर्च पाण्यात जाऊनही सेवा मात्र प्रवाशांना अद्यापही मिळत नाही. घरबसल्या एसटीचे लोकेशन पाहण्याची इच्छा सध्यातरी कागदावरच आहे.

सेवेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम सध्या अधिकारी स्तरावर कार्यान्वित आहे. ती प्रवाशांना कधी उपलब्ध होईल याबाबत वरिष्ठ कार्यलयीन पातळीवर निर्णय होत असतो. त्याबाबत स्थानिक स्तरावर काहीच निर्णय घेतला जात नसल्याने या सेवेबाबत अधिकृत निश्चित अशी माहिती सांगता येत नाही.
- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT