City Water Supply : शहराच्या पाण्याचे वेळापत्रक कोलमडले file photo
छत्रपती संभाजीनगर

City Water Supply : शहराच्या पाण्याचे वेळापत्रक कोलमडले

एक्स्प्रेस जलवाहिनीवर २४ तासांचा शटडाऊन : पाच जलकुंभांचा पुरवठा ठप्प

पुढारी वृत्तसेवा

The city's water supply schedule has been disrupted

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात आधीच आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती आणि नवीन जलकुंभांच्या जोडणीसाठी घेण्यात आलेल्या २४ तासांच्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहे.

१११८ मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील कामे सोमवारी (दि. १२) सकाळी आठपासून मंगळवारी (दि. १३) सकाळी आठपर्यंत हाती घेण्यात आली. जोडणीचे काम पूर्ण झाले असले, तरी पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी पुढील एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रगतिपथावर असलेल्या आमेरनगर, सुधाकरनगर, एस.एफ. एस. गारखेडा आणि ए.जी.पी. हायस्कूल येथे नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहेत. या जलकुंभांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीला छेद जोडणी करण्याचे काम शटडाऊनदरम्यान करण्यात आले.

मुख्य मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्याचे तातडीचे कामही याच कालावधीत करण्यात आले. या कामांमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील संबंधित जलकुंभांचा पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. यापूर्वीही शटडाऊन घेण्यात आल्याने नागरिकांना पाणीपुरवठ्यातील विलंबाचा सामना करावा लागला आहे. आता २४ तासांचा शटडाऊन संपल्यानंतरही लगेच नियमित पुरवठा सुरू होणार नाही. जलकुंभ भरणे आणि त्यानंतर संबंधित भागांत पाणी सोडण्याच्या प्रक्रियेमुळे काही भागांत पाणी उशिराने मिळेल.

पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन

भविष्यात शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करावा आणि पाणीसाठा जपून ठेवावा, असे आवाहन अभियंता दत्तात्रय गायकवाड यांनी केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT