The city's 24-year wait will end, water supply from the 2500-meter water pipeline in December
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरवासीयांची दररोज पाणीपुरवठ्याची २४ वर्षांची प्रतीक्षा येत्या दीड महिन्यात संपणार आहे. डिसेंबरपासून शहराला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या जॅकवेलच्या शेवटच्या स्लॅबचे काम आज सोमवारपासून सुरू होणार असून, महिनाभरात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर स्लॅबवर मोटार बसवून धरणातून पाण्याचा उपसा सुरू केला जाणार आहे.
ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात २००१ सालापासून एक दिवसआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यापूर्वी हा पाणीपुरवठा दररोज केला जात होता. परंतु २००१ नंतर शहराच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सतत पाण्याचे गॅप वाढविणे सुरूच राहिले. हा प्रकार रोखण्यासाठी २००५ साली महापालिकेच्या सभागृहात पहिल्यांदा नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी चर्चा झाली. त्यानंतर या जलवाहिनीसाठी शासनाकडे पाठपुरवठा करणे, प्रस्ताव तयार करणे आणि इतर प्रक्रिया सुरू झाली. मात्र प्रत्यक्षात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम २०२१ साली सुरू झाले.
दरम्यान, हे अन् २०२५ मध्ये नक्षत्रवाडी ते जायकवाडी अशी ३८ किलोमीटर अंतरात २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. आज या जलवाहिनीचे १२ पैकी ८ गॅप एकमेकांशी जोडण्याचेच काम शिल्लक आहे. तर जायकवाडीत जॅकवेलचे पहिल्या टप्प्यातील कामही संपण्याच्या दिशेने आहे.
२७ मीटर उंचीच्या जॅकवेलचा शेवटचा स्लॅब आजपासून सुरू होत आहे. पुढील तीन आवठड्यात हा स्लॅब वापरात येणार असून त्यावर पाणी उपसाच्या पंपाची मोटार बसविली जाणार आहे. हे काम होताच, मुख्य २५०० मिमी व्यासाच्या नव्या जलवाहिनीतून नक्षत्रवाडीच्या दिशेने पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांची दररोज पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा संपणार आहे.
जायकवाडीतील जॅकवेलवर शेवटचा स्लॅब उभारणीचे काम आजपासून सुरू होत असल्याची माहिती मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली. या कामासाठी सुमारे १४० कामगार कार्यरत राहणार आहे. त्यामुळे डिसेंबरचरी डेडलाईन पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
दररोज पाणीपुरवठ्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यावेळचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी २००१-०२ साली दिल्लीगेट, सिडको जलकुंभावरील सर्व पाण्याचे टप्पे एक दिवसआड करून पुरवठा सुरळीत केला. हळूहळू २००५ पर्यंत संपूर्ण शहर एक दिवसआडवर गेले. २०११ सालापासून पाणीपुरवठा दोन दिवसांआडवर गेला. २०१५-१६ साली तीन दिवसांआडवर गेला होता.