The challenge of preventing water waste in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील उपलब्ध पाणीसाठा पुढील आठ महिने पुरविण्याचे आव्हान असताना दुसरीकडे नळाला पाणी येताच रस्त्यांवर पाणी वाहून जात असल्याचे चित्र कायम आहे. पाण्याची नासाडी होत असल्याचे नागरिक नगरसेवकांना फोन करून सांगतात. मात्र पाणीपुरवठा बंद होईपर्यंतही ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी वाढली आहे. पाणी वाया घालविणाऱ्यांवर दंड आणि फौजदारी कारवाईचा इशारा देणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या अंमलबजावणीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याचे आवाहन शासनाने केले आहे. महापालिकेनेही पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर तीन टप्प्यांत दंडात्मक कारवाई करून त्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. काही ठिकाणी कारवाईही करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात पाण्याची नासाडी सुरूच असल्याने या इशाऱ्याचा कितपत धाक उरला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या सिडको परिसरातील दौऱ्यादरम्यान रस्त्यावरून वाहणारे पाणी त्यांच्या निदर्शनास आले होते. तसेच तीन दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यावर घरातील शिल्लक पाणी सांडून पाणी भरले जात असल्याचे चित्रही त्यांनी पाहिले. पाण्याचा अपव्यय थांबला नाही, तर पाणीपुरवठ्यातील अंतर वाढवावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. सिडकोतील एका भागातील महिलांनी सोमवारी सकाळी पाणी वाया जात असल्याची माहिती फोनद्वारे नगरसेवकांना दिली.
मात्र, संबंधित भागातील पाणीपुरवठा बंद होईपर्यंत ठोस कार्यवाही झाल्याचे दिसले नाही. नागरिकांना वारंवार तोंडी सूचना देऊनही ते ऐकत नसतील, तर किती वेळा जनजागृती करायची, असा सवाल एका नगरसेवकाने उपस्थित केला. पाणीवितरणाच्या वेळी महापालिका आणि पोलिसांची पथके तैनात करून नासाडी रोखण्याचे नियोजन असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
मात्र, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रत्यक्षातील परिस्थिती पाहता या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. जर पाणीपुरवठ्याच्या वेळेतच पथके सक्रिय नसतील, तर नासाडी रोखणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई, पाणीवितरणाच्या वेळी नियोजित पथकांची प्रत्यक्ष तैनाती आणि नियमांनुसार दंडात्मक उपाययोजना झाल्या, तरच अपव्ययाला आळा बसू शकतो. अन्यथा पाणी बचतीचे आवाहन आणि प्रत्यक्षातील नासाडी यांतील अंतर कायम राहील. उपलब्ध पाणीसाठा सर्वांना पुरवायचा असेल, तर प्रशासनाला आता केवळ इशारे देण्याऐवजी कृती करावी लागणार आहे.
जबाबदारी केवळ नागरिकांचीच ?
शहरात पाणी उपलब्ध असताना लगतच्या ग्रामीण भागांत हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. या विरोधाभासाची जाणीव ठेवून पाणी बचतीसाठी केवळ आवाहने करून चालणार नाही. नागरिकांनी जबाबदारीने पाणी वापरण्याबरोबरच आमदार, खासदार, मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीही जनजागृतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक