चंद्रशेखर बावनकुळे  (File photo)
छत्रपती संभाजीनगर

महापौरपदासाठी भाजप जुन्यांनाच संधी देणार

मंत्री बावनकुळे यांचे संकेत, आज मुंबईच्या बैठकीत ठरणार उमेदवार

पुढारी वृत्तसेवा

The BJP will give opportunities to its old-timers for the mayoral post

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप महापौर पदासाठी योग्य उमेदवार देणार आहे. मुंबईत आज त्यासाठी बैठक होणार असून, त्यात नाव ठरेल. मात्र बाहेरून आ-लेला नव्हे तर पक्षातील जुन्या, किमान दोन वेळा नगरसेवक राहिलेल्यांपैकीच एक उमेदवार देऊ, असे संकेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी (दि.१) पत्रकार परिषदेत दिले. जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ते शहरात आले होते.

यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, संजय केणेकर, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, संजय खंबायते, अनिल मकरिये, बसवराज मंगरुळे, किरण पाटील, हर्षवर्धन कराड, डॉ. उज्ज्वला दहिफळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बावनकुळे म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत युती असूनही काही ठिकाणी शिवसेनेने शब्द पाळला नाही.

निवडणुकीनंतर यावर चर्चा होईल. जेथे युती नाही तेथे लढत होणारच, पण जेथे सोबत आहोत तेथे प्रामाणिकपणे काम करणार. मतभेद आहेत मनभेद नाही. मित्रपक्षच नव्हे तर विरोधकांवरही टीका-टिपणी करणार नाही, ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्द्यावर लढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार नसल्याबाबत विचारले असता मंत्री बावनकुळे म्हणाले की, अजित पवार यांच्या आकस्मित निधनाने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सहकारी अकाली सोडून गेल्याने राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रचारापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या महापौरपदी कोण, याबाबत विचारले असता मंत्री बावनकुळे म्हणाले की, याबाबत चर्चा सुरू आहे. या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक होणार आहे. त्यात महापौरपदाचा उमेदवार निश्चित होईल. शहरातून मंत्री अतुल सावे हे या बैठकीस उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले. पाच-सहा जणांचे नाव चर्चेत असून, लवकरच निर्णय जाहीर होईल, असे त्यांनी नमूद केले. नगरसेवक म्हणून अनुभवी असलेला, सर्वांना सोबत घेऊन चालणार, किमान दोन वेळा नगरसेवक राहिलेल्यांपैकीच एक उमेदवार देण्यात येईल. पक्षातील जुन्यांनाच संधी मिळेल, असे संकेतही त्यांनी दिले.

आ. केणेकरांचे कान टोचले

पत्रकार परिषदेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसोबत नाश्ता केला. यावेळी आमदार संजय केणेकर यांनी महसूल मंत्री बावनकुळे आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यामध्ये बसलेल्या एका पत्रकाराची खुर्ची ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावर पत्रकाराने ती खुर्ची आमदारांना देऊ केली, परंतु नको मी मस्करीत बोललो, असे आमदार केणेकर म्हणाले. तर तुझ्या या मस्करीमुळेच लोक तुझ्याकडून दुरावताय म्हणत मंत्री बावनकुळे यांनी आमदाराचे कान टोचले.

यांची नावे चर्चेत

महापौर पदासाठी महेश माळवतकर, समीर राजूरकर, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे, विजय औताडे, राजगौरव वानखडे यांची नावे चर्चेत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT