मांजामुळे निरागस बालके गंभीर जखमी होत असल्याबद्दल खंडपीठाकडून चिंता File Photo
छत्रपती संभाजीनगर

Manja News : मांजामुळे निरागस बालके गंभीर जखमी होत असल्याबद्दल खंडपीठाकडून चिंता

प्रतिबंध तरीही शहरात येतो कसा? प्रशासन जागे होणार का? नाराजी व्यक्त करत अहवाल सादर करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

The bench is concerned that innocent children are being seriously injured due to manja

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

प्रतिबंधित मांजाच्या विक्री, खरेदी, साठवणूक आणि वाहतुकीवर बंदी असतानाही असा मांजा शहरांमध्ये येतो कसा ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेने वेणेगावकर यांनी सोमवारी उपस्थित करून, मांजामुळे निरागस बालके गंभीर जखमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच पोलिस, पालिका प्रशासन जागे होणार का ? असा प्रश्न विचारून तीव्र नाराजी व्यक्त करत खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्तांनी याप्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल १६ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूवी महात्मा गांधी मिशन रुग्णालयाच्या परिसरातून जाणाऱ्या एका तीनवर्षीय बालकाला मांजामुळे गंभीर दुखापत झाली. या घटनेचे वृत्तपत्रातून वातींकन झाल्यानंतर सोमवारी खंडपीठाने जुनी प्रलंबित सुमोटो जनहित याचिका सुनावणीसाठी घेतली. यावेळी संबंधित मांजा विक्रीवर व शहरात आयात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक काय उपाययोजना केल्या, मांजाचे उत्पादन, पुरवठा कोण करतो, याचा तपास केला का, ऑनलाईन मांजा विक्री पोर्टलवर काय प्रतिबंधात्मक कारवाई केली, अशी विचारणा करून खंडपीठाने कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्तांनी यासंदर्भातील कारवाईचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.

या संदर्भात राज्य शासनाकडून निवेदन करण्यात आले की, संबंधित मांजाची विक्री, खरेदी, साठवणूक व वाहतुकीवर बंदी घातलेली आहे. तसेच मांजाच्या प्रश्नावर स्थानिक स्वराज्य संस्था व अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. शासनाकडून मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.

दोन दिवसांत ३ गुन्हे

छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील दोन दिवसांमध्ये प्रतिबंधित मांजा विक्री, खरेदी करण्याशी संबंधित तीन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली. तसेच भित्तिपत्रक, जनजागृती, शाळा, महाविद्यालयांमध्ये माहिती पोहोचवणे, आदींवर काम करण्यात येत असल्याचेही पोलिस विभागाकडून खंडपीठात सांगण्यात आले. असेच निवेदन मनपाकडूनही करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT