The Bench dismissed the petition challenging MLA Khotkar's election
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. किशोर संत यांनी फेटाळून लावली.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला होता. आ. खोतकर यांच्या निवडणुकीला कैलास गोरंट्याल यांनी आव्हान दिले होते.
याचिकेत म्हणणे मांडण्यात आले होते, की खोतकर हे जालना बाजार समितीचे मुख्य प्रशासक हे लाभाचे पद धारण करीत असल्याने ते विधानसभा निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत. खोतकर यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेले शपथपत्र विहित नमुन्यात नव्हते तसच करून निवडणूक आयोगाने नियमांचे उल्लंघन निवडणूक घेतली, ज्यामुळे खोतकर यांना फायदा झाला.
या याचिकेत खोतकर यांनी दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश ७नियम ११ नुसार अर्ज करून गोरंट्याल यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्यात तथ्य नाही त्यामुळे त्यांची याचिका प्राथमिक टप्प्यावरच रद्द करावी अशी विनंती केली होती.
आ. खोतकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील संजीव देशपांडे यांनी म्हणणे मांडले, की एखाद्या व्यक्तीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील धारण केलेले पद हे त्या व्यक्तीस विधानसभा निवडणूक लढविण्यास अपात्र करत नाही. अशी अपात्रता केवळ राष्ट्रपती व यांच्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी असते. तसेच खोतकर यांच्या उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र विहित नमुन्यात असून, त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. निवडणूक आयोगावर करण्यात आलेले आरोप निराधार असून, त्यांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी एकही पुरावा दिलेला नाही.
सुनावणीअंती खंडपीठाने आमदार अर्जुन खोतकर यांचा अर्ज मंजूर करून कैलास गोरंट्याल यांची याचिका फेटाळून लावली. आ. खोतकर यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील संजीव देशपांडे यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. सुबोध शाह व अॅड. प्रतीक भोसले यांनी सहकार्य केले.