The battle for the Municipal Corporation and Zilla Parishad elections has begun.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रणधुमाळीला आजपासून सुरुवात होत आहे. शुक्रवारी (दि.१०) शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे, तर भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत जिमखाना येथे मराठवाडा पदविधर मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या नियोजनाची बैठक होणार आहे. तसेच उद्या शनिवारी शिवसेना ठाकरे गटाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला जाणार आहे. या तिन्ही नेत्यांच्या बैठक, मेळावा आणि मोर्चामुळे शहरात निवडणुकीचे वातावरण निर्माण होणार आहे.
राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती आहे. मात्र असे असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियोजनाच्या बैठका वेगवेगळ्या होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीत लढणार की स्वबळावर, असा सवाल उपस्थित होत आहे.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना पक्षाच्यावतीने शुक्रवारी पक्षाच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आयोजि आला आहे. या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शहरातील संत एकनाथ रंगमंदिर येथे सकाळी ११ वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या गटप्रमुखांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबतच सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरणारे, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे हेही उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष संघटनात्मक बळकटी, आगामी निवडणूक तयारी आणि पक्षाच्या पुढील वाटचालीवर चर्चा होणार आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व गटप्रमुखांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: अगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आज शहरातील हॉटेल जिमखान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसह विभागातील आठही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांचे विभागीयस्तरावर नियोजन केले जाणार आहे. सायंकाळी ४ वाजता फडणवीस हे नाशिकहून शहरात येणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ही बैठक होणार आहे. यासाठी मराठवाड्यातील भाजपचे सर्व आमदार, खासदार, शहर व ग्रामीण अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती रहाणार आहे.