'The Art of Living' organizes Chandi Homa festival
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : 'द आर्ट ऑफ लिव्हिंग' व वैदिक धर्म संस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त चंडी होम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा त्रिदिवसीय धार्मिक सोहळा १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान रेल्वे स्टेशन रोडवरील वेदांतनगर, लाभचेंबर (एमटीडीसी समोर) येथे पार पडणार आहे.
शहरात २०१६ पासून हा उत्सव अविरतपणे वैदिक व शास्त्रोक्त पद्धतीने साजरा केला जात असून, विधीसाठी बेंगळुरू येथील मुख्य वेदपाठशाळेतील विशेष स्वामीजी व पंडितजी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्रातील शक्तिपीठांच्या मूर्तीची स्थापना हे असणार आहे. भाविकांना सकाळी ७:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत ने या दुर्मिळ मूर्तीचे दर्शन घेता येईल. साडेतीन तसेच उपस्थित भाविकांसाठी उपवास, फराळ व महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून दररोज पूजेदरम्यान सुमधूर सत्संगाचेही आयोजन असेल.
महोत्सवांतर्गत शुक्रवारी (दि. १६) सकाळी ८:३० वाजता सामूहिक संकल्प, श्री महागणपती होम, नवग्रह होम, वास्तु होम (पूर्णाहुती दुपारी १२ वा.) आणि सायंकाळी ६ वाजता सुदर्शन होम होईल. शनिवारी (दि. १७) सकाळी ८ वाजता सामूहिक संकल्प, रुद्र पूजा व रुद्र होम (पूर्णाहुती दुपारी १२:३० वा.) आणि सायंकाळी ६ वाजता चंडी कलश स्थापना व चंडी पारायण पार पडेल. तर रविवारी (दि. १८) अष्टमीनिमित्त सकाळी ७:३० वाजता श्री महा चंडीका होम सुरू होऊन दुपारी १२:३० वाजता पूर्णाहुती होईल, त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद वाटप करण्यात येईल.
सध्याच्या धकाधकीच्या वातावरणात मानवी मनाला ऊर्जा व सकारात्मकता लाभावी, यासाठी या महोत्सवात सर्व नागरिकांनी सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन शिवशंकर स्वामी, प्रभंजन महतोल, देवेंद्र लड्डा यांनी केले आहे.