The annual fair of Goddess Shivai commenced with the pulling of twelve chariots
शिवना, पुढारी वृत्तसेवा : ग्रामदैवत कुलस्वामिनी आई श्री शिवाई देवीच्या वार्षिक यात्रौत्सवास गुरुवारपासून (दि.२) उत्साहात सुरुवात झाली. नवसाला पावणारी देवी, अशी ओळख असलेल्या शिवाई देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. बारागाडे ओढून तसेच वगदी मिरवणुकीत सहभागी होत भाविकांनी आपले नवस फेडले.
यात्रेच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे पाच वाजल्यापासून मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. महिला भाविकांनी देवीसमोर हजारो दिव्यांची आकर्षक आरास मांडून शोडषोपचार पूजा व नैवेद्य अर्पण केला. फिरत्या वगदी खांबावर सादर करण्यात आलेल्या चित्तथर-ारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. संध्याकाळी निघालेल्या वगदी मिरवणुकीत रेवड्यांची उधळण, तगदराव व विविध पारंपरिक कसरतींनी वातावरण भक्तिमय व उत्साही झाले. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
दरम्यान, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. अजिंठा येथील सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, पोलीस कर्मचारी भागवत शेळके, संदीप कोथलकर यांनी दिवसभर सेवा बजावली. देवीच्या स्वारीने यात्रोत्सवाची सांगता मंदिरात घटस्थापनेपासून सप्तशती पाठ सुरू असून बुधवारी (दि.१) होमहवन व पूजाविधी पार पडले.
गुरुवारी बारागाडे ओढण्याचा नवस, दिवसभर दर्शन, संध्याकाळी वगदी मिरवणूक आणि रात्री बालाजी महाराजांची मिरवणूक झाली. शुक्रवार (दि. ३) ते मंगळवार (दि.७) दरम्यान दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारच्या उत्तररात्री (दि.८) पहाटे साडेतीन वाजता देवीची स्वारी निघणार असून, बालाजी मंदिरात विसावल्यावर यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यंदा सात दिवस उपवास करून भाऊ महाराज जोशी हे देवीची स्वारी घेणार आहेत.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी संत निरंकारी मिशनतर्फे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन तेजराव पाटील काळे व माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधराव काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाई संस्थानचे पदाधिकारी व निरंकारी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मागील अनेक वर्षापासून हा उपक्रम राबविला जातो.