The alliance formulas have been decided, it's fifty-fifty between Shiv Sena and BJP.
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेची निवडणूक युतीमध्ये लढण्यासाठी शिवसेना-भाजपात सोमवारी (दि. २२) सहावी बैठक झाली. यात दोन्ही पक्षांकडून ५०-५० (फिफ्टी फिफ्टी) जागांच्या फार्म्युल्यावर चर्चा झाली आहे. परंतु भाजपने काही वाढीव जागांसाठी रेटा लावून धरला आहे. त्यासोबतच प्रमुख २० बॉडीवर दोन्ही पक्षांमध्ये मतभेत असल्याने आज मंगळवारी पुन्हा सहावी बैठक होणार असून, मतभेद असलेल्या वॉडांवर मुंबईतच शिक्कामोर्तब होणार असल्याचे संकेतही दोन्ही पक्षांकडून मिळाले आहेत.
महापालिका निवडणूक युतीमध्येच लढावी, असे शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार मागील आठवडाभरापासून युतीसाठी दोन्ही पक्षांत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. पहिल्या चार बैठका विविध हॉटेल्समध्ये पार पडल्यानंतर आज (दि.२२) पाचवी बैठक ही शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या निवासस्थानी पार पडली.
यात सेनेकडून जंजाळ यांच्यासह माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर विकास जैन, ऋषिकेश जैस्वाल यांची, तर भाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, माजी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, निवडणूक प्रमुख समीर राजूरकर, माजी महापौर प्रशांत देसरडा यांची उपस्थिती होती. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून एकमेकांना जागांचा फार्म्युला देण्यात आला आहे. सेनेने दिलेल्या फाम्र्म्युल्यावर भाजपने नकार देत वाढीव जागांसाठी आग्रह धरला आहे. परंतु फिफ्टी फिफ्टीवरच चर्चेचे गुऱ्हाळ अडकल्याचे कळते. त्यासोबतच प्रभागांवरील चर्चेत सुमारे २० वॉडांवर दोन्ही पक्षांत मतभेत असून, त्यावर मुंबईतूनच तोडगा निघेल, असे सूत्रांनी सांगितले.
सेनेकडून चार दिवसांची डेडलाईन
युतीसाठी शिवसेनेकडून भाजपला जो फाम्र्युला देण्यात आला आहे, त्यावर येत्या चार दिवसांत निर्णय घेण्यात यावा, असेही सांगण्यात आले आहे. त्यानंतर युती करावी की नाही, याबाबतचा प्रस्ताव शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करेल, असेही सूत्रांनी सांगितले.
चर्चा सकारात्मक युतीसंदर्भात चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रभागांवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. पुढील बैठकीत काही विशेष निर्णय होईल.-किशोर शितोळे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
बोलणी सुरूच युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नसून अजूनही प्रभागांवरच चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत आणखी बैठक होणार आहे.- राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिवसेना