The Ajanta-Ellora Festival will be held at Ellora this year
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव वेरूळला घेण्याची तयारी जिल्हा प्रशासन करीत आहे. तसे निर्देशही जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. त्यासोबतच यावर्षीच पुढील ३ वर्षांच्या तारखांसह नियोजन करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषदच्या सीईओ मिन्नू पी.एम. सहआयुक्त रिता मेत्रेवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, पोलिस उपायुक्त पंकज अतूलकर, सहायक आयुक्त (नियोजन) सुनील सूर्यवंशी, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव, महानपालिकेचे उपायुक्त अंकुश पांढरे, पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक अरुण मलिक, राम भोगले, जसवंत सिंग, हरप्रीत सिंग यांच्यासह पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध भागधारक व प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कायलायातील सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, शाश्वत पर्यटन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व वारसास्थळांसह परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रशासनासोबत टॅक्सी, ऑटो, बसचालक, हॉटेल व्यावसायिक, विक्रेते, पर्यटन मार्गदर्शक आणि इतर संबंधित घटकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
पर्यटकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असेही ते म्हणाले. तसेच विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार अजिंठा-वेरूळ महोत्सव दरवर्षी आयोजितबाबत नियोजन करण्यात येत आहे. यावेळी वेरूळ येथे 'वेरूळ महोत्सव' आयोजित करण्याचे नियोजन करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने आगामी तीन वर्षांतील महोत्सवांचे वेळापत्रक आतापासूनच निश्चित करण्याचे नियोजन असल्याची माहितीही जिल्हाधिकारी गौडा यांनी दिली. पर्यटन संस्था, हॉटेल व्यावसायिक, प्रवास संस्था, सहली आयोजक तसेच इतर भागधारकांनी पर्यटन विकासासाठी विविध सूचना व मते मांडली-
पर्यटन स्थळांच्या सुरक्षेवर लक्ष
जिल्ह्यातील पर्यटन विकास, पर्यटनस्थळांची व पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था, पायाभूत सुविधा, स्वच्छता तसेच पर्यटन व्यावसायिकांच्या विविध अडचणी सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ-घृष्णेश्वर परिसरात मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही आढावा घेण्यात आला.