ten lakh rupees lampas from hotel owner account
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: हॉटेल व्यावसायिकाने बँक ऑफ महाराष्ट्राची ऑनलाईन बँकिंग सुविधा घेतलेली नसताना त्याच्या खात्यातून तब्बल १० लाख २३ हजारांची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (दि. २३) दुपारी अडीचच्या सुमारास कांचन रेस्टोरंट, धूत हॉस्पिटल येथे घडली.
फिर्यादी शशिकांत दत्तूराव वाघ (४५, रा. धूत हॉस्पिटलसमोर, म्हाडा कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्र, चिकलठाणा शाखेत खाते आहे. त्यांनी बँकेची ऑनलाईन पैसे ट्रान्स्फरची कोणतीही सुविधा घेतलेली नाही. हॉटेल असल्याने फोन पेद्वारे पैसे घेण्याचीस सुविधा तेवढी सक्रिय आहे.
दरम्यान, ते रविवारी त्याच्या हॉटेलमध्ये असताना दुपारी अडीचच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर नऊ वेळा पैसे ट्रान्स्फर झाल्याचे मॅसेज आले. त्यात १० लाख २३ हजार ४६४ रुपये कपात झाल्याने त्यांना धक्काच बसला. विशेष म्हणजे रविवारी असल्याने बँक बंद असताना हा प्रकार घडला. त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून ऑनलाईन तक्रार नोंदविली. सोमवारी (दि. २४ बँक ऑफ महाराष्ट्रच्या चिकलठाणा शाखेत जाऊन मॅनेजरकडे तक्रार केली. त्यांनी तुमची तक्रार पाठवण्यात आली असून, लीगल टीम त्यावर काम करत असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात जाऊन ऑनलाईन तक्रारीची माहिती घेतली तेव्हा पोलिसांनी ट्रॅन्जेक्शन रक्कम प्रलंबित असल्याचे दाखविले. त्यामुळे पुन्हा वाघ यांनी बैंक गाठून चौकशी केली. परंतु त्यांनी त्याबाबत माहिती दिली नाही. वाघ यांची मोठी रक्कम गेल्याने मानसिक धक्का बसला.
कोणीतही माहिती बँकेतून न मिळाल्याने वाघ यांनी पुन्हा ऑनलाईन तक्रारीत काय झाले याची पाहणी केली. तेव्हा त्यांच्या बँक खात्यातून रत्नाकर बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंड्यूसन्ड बँकेच्या विविध १५ खात्यांमध्ये १० लाख २३ हजार ४६४ एवढी रक्कम परस्पर ट्रान्स्फर झाल्याचे समोर आले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुरुवारी (दि. २७) गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक गीता बागवडे करत आहेत.