Teacher's mangalsutra snatched from moving scooter
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नणंदेला भेटण्यासाठी स्कूटीवरून जाणाऱ्या एका शिक्षिकेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि.६) सकाळी ७:४५ वाजता पुंडलिकनगर भागातील रिलायन्स मॉलसमोर घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियांका मुकेश चुडीवाल (४०, रा. एन-७, सिडको, अयोध्यानगर) यांच्या तक्रारीनुसार, त्या राजाबाजार येथे एका शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. रविवारी (दि. ६) सुट्टी असल्याने प्रियांका या सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या शिवाजीनगर येथे राहणाऱ्या नणंदेला भेटण्यासाठी स्वतःच्या स्कूटीवरून निघाल्या होत्या.
पावणेआठ वाजेच्या सुमारास त्या रिलायन्स मॉलसमोरून जात असताना, पाठीमागून एका जुन्या दुचाकीवर दोन अज्ञात व्यक्ती आले. या चोरट्यांनी आपली दुचाकी प्रियांका यांच्या स्कूटीच्या अगदी जवळ आणली. याचवेळी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने प्रियांका यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण बाजारभावानुसार किंमत दीड लाखापेक्षा अधिक) अचानक ओढून तोडले.
या झटापटीत गाडी जोरात चालवून हे दोन्ही चोरटे शिवाजीनगरच्या दिशेने पसार झाले. पाठीमागे बसलेल्या चोरट्याने अंगात काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते, तोंडाला मास्क लावला होता आणि डोक्यावर काळ्या रंगाची टोपी होती. प्रियांका यांनी तत्काळ गाडी बाजूला घेऊन पतीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांनीही पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार लक्ष्मण राठोड करत आहेत.
मुकुंदवाडीत महिलेचे मंगळसूत्र लंपास
मुकुंदवाडी भागातील विठ्ठल चौकात बहिणीसोबत राखी घेण्यासाठी गेलेल्या सुजाता मुकेश जमधडे (११९, रा. रमानगर, क्रांती चौक) यांच्या गळ्यातील दोन ग्रॅमचे डोरले, पाच मणी एका महिलेने लंपास केले. ही घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी रविवारी (दि.६) मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक नरसिंग पवार करत आहेत.