सिल्लोड : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण राज्यमंत्री तथा शिक्षक परिषदेचे पालक पंकज भोयर यांची भेट बैठक घेण्यात आली. यात विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधत वस्तीशाळा शिक्षकांच्या सेवेसाठी नियुक्ती दिवस ग्राह्य धरावा, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास सांगळे यांनी दिली.
शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील नाग भवन निवासस्थानी भेट घेऊन राज्यातीत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही बैठक यशस्वी ठरल्याचे परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.
बैठकीत शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरातील शिक्षकांच्या भावना आणि अपेक्षा शिक्षण राज्यमंत्र्यांकडे मांडल्या.
राज्य शासनाने केंद्र शासनाशी समन्वय साधून सरसकट टीईटी लागू न करण्याचा निर्णय घ्यावा, शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांची संख्या मोजूनच संचमान्यता मंजूर करण्यात यावी, आंदोलनातील शिक्षकांच्या पगार कपात निर्णय मागे घ्यावा, अशा विविध मागण्या शिक्षक परिषद संघटनेने केल्या आहेत.
बैठकीला प्रदेश सहकार्यवाह नितीन पवार, जिल्हाध्यक्ष देविदास सांगळे, जिल्हा सहकार्यवाह साईनाथ भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता हावळे, जिल्हा सहकार्यवाह हनुमंत पारखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसह वस्तीशाळा शिक्षकांच्या सेवाग््रााह्यतेचा प्रश्नावर आ. अभिमन्यू पवार यांनी विधानसभा सभागृहात चर्चा घडवून आणली. ही शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बाब असून शिक्षण राज्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देविदास सांगळे यांनी दिली.