Talathi, Mandal officer system weak: District Collector
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महसूल विभागात तलाठी आणि मंडळ अधिकारी हा महत्वाचा घटक आहे. मात्र सध्या हीच यंत्रणा कमकुवत झाली असून, तिला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक घेतली. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यालय प्रमुख उपस्थित होते. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यात पीसीपीएनडीटीनुसार तपासणी, बालविवाह, आरोग्य यंत्रणा सुधारणा, प्रलंबित फेरफार, महिला सक्षमीकरण यासह विविध उपक्रमांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४० हजार एकल महिला आढळल्या आहेत. एकल महिलांसाठी मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात वेळा, शिस्त, कामाची कालमर्यादा पाळणे याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पगारात भागवा, तलाठ्यांना सल्ला
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठकीत तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कार्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाकडून मिळणाऱ्या पगारात भागवा आणि खाल्ल्या मिठाला जागा, तसेच नवीन वर्षात स्वतःची कार्यक्षमता वाढवा, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी या दोन्ही घटकांना केले.
यापुढे आदेश क्यू आर कोडसह
बनावट आदेशांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने क्यू आर कोडचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार १ जानेवारीपासून क्यू आर कोडसह महसूलचे सर्व आदेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी एनआयसीमार्फत सर्वांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सेवानिवृत्तीनंतरही अनेकांना पेन्शनमध्ये अडथळे येतात. सेवापुस्तिका अद्ययावत नसणे हे त्यामागील एक कारण आहे. म्हणून शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी संबंधित विभागात सर्वांच्या सेवापुस्तिका अपडेट करण्यास सांगितले आहे. तलाठी, मंडळ अधिकारी यंत्रणाही सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी.