

Municipal Corporation will now confine stray dogs
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मोकाट कुत्र्यांकडून पादचाऱ्यांसह आणि चिमुकल्यांवर हल्ला करून लचके तोडण्याच्या घटना वाढत आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने मोकाट कुत्रे पकडल्यानंतर ते सोडण्याऐवजी मोठ्या पिंजऱ्यांमध्येच बंदीस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पहिले शाळा, दवाखाने, बसस्टँड आणि रेल्वेस्टेशनच्या परिसराला टार्गेट केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहरात मागील काही दिवसांपासून विविध वसाहतींमध्ये मोकाट कुत्र्यांच्या उच्छाद सुरू आहे. त्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांमध्ये दशहत पसरली आहे. शिवाय कुत्र्याच्या चाव्यामुळे काही मुलांचा उपचाराअभावी रेबीजने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारामुळे आता महापालिकेने न्यायालयाच्या आदे शानुसार मोकाट कुत्र्त्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका सध्या मोकाट कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करते.
त्यानंतर ज्या भागातून हे कुत्रे पकडून आले, तेथेच पुन्हा नेऊन सोडते. या कुत्रांना महापालिकेकडून रेबीज प्रतिबंधक लस देखील दिले जाते. एवढे करूनही शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ होणे सुरूच आहे. त्यामुळे आता महापालिकेने शहरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
हा प्रयोग पहिले रेल्वेस्टेशन, बसस्टँड, दवाखाने, रुग्णालये, शाळा महाविद्यालय, खेळाचे मैदान याभागात राबविणार आहे. यात महापालिका मोकाट कुत्रे पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेच शिवाय, या शस्त्रक्रियेनंतर हे कुत्रे पुन्हा त्या भागात नेऊन सोडण्याऐवजी पशुसंवर्धन विभागातच मोठ्या पिंजऱ्यांमध्ये त्यांना बंदीस्त ठेवले जाणार आहे. शहरात असे पिंजरे विविध भागांत तयार करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरात ६० हजार कुत्रे
शहरात पाळीव व मोकट कुत्र्यांची एकूण संख्या ६० हजारांवर आहे. यात पाळीव कुर्त्यांची संख्या ही सुमारे ५ हजार आहे. तर सुमारे ५५ हजारांहून अधिक मोकाट कुर्त्यांची संख्या असल्याची माहिती प्रशासकी यंत्रणांकडून देण्यात आली आहे.
मनपाकडे सध्या ४ पिंजरे
महापालिकेकडे सध्या ४ पिंजरे आहेत. त्यात सुमारे ५०० च्या जवळपास मोकाट कुत्रे बंदीस्त ठेवता येतील एवढी क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे.