Bribe Case : सातबाऱ्यासाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात file photo
छत्रपती संभाजीनगर

Bribe Case : सातबाऱ्यासाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात

सातबाऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी लाचेची मागणी करणा-या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडत सिल्लोड तालुक्यात खळबळ उडवली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Talathi accepting bribe for 7/12 extract caught in the net

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :

सातबाऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी लाचेची मागणी करणा-या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडत सिल्लोड तालुक्यात खळबळ उडवली आहे. तलाठी प्रशांत रमेश देवगया (३४ सजा केळगाव, ता. सिल्लोड, रा. विठ्ठल कला सोसायटी, आनंद पार्कजवळ, भराडी रोड, सिल्लोड) यास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.

या प्रकरणातील मूळ तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे ५ जानेवारी २०२६ रोजी केळगाव येथील गट नंबर ५५१ मधील एक गुंठा जमीन खरेदी केली होती. या जमिनीचा फेरफार मंजूर करून सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी संबंधित तलाठ्याने ७ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली.

या तक्रारीची पडताळणी करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक केशव नाना दिंडे यांनी पंचासमक्ष कारवाई केली. पडताळणीत तलाठीने ७ हजार रुपयांची मागणी करत तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला.

बुधवारी (दि.८) तलाठीने तक्रारदारास प्रथम भराडी येथे बोलावले, त्यानंतर बोरगाव बाजार येथे स्थलांतरित करत अखेर पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. अंगझडतीत ५ हजार रुपयांची लाच रक्कम, ४०० रुपये स्वतःचे रोख व मोबाईल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तलाठीला ताब्यात घेण्यात आले आहे. घरझडतीची कारवाईही सुरू आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलिस निरीक्षक केशव नाना दिंडे यांनी केले. पोलिस उपाधीक्षक राजीव तळेकर यांचे पर्यवेक्षण होते. पुढील तपास पो.नि. शांतीलाल चव्हाण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT