Parbhani Bribe Case : पाथरीत खळबळ, ८ हजारांची लाच घेताना 'भूमी अभिलेख'चा कर्मचारी रंगेहात जेरबंद

Bribe News
Bribe NewsPudhari
Published on
Updated on

परभणी : पाथरी तालुक्यात लाचखोरीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अत्यंत नियोजनबद्ध आणि धडक कारवाई करत भूमी अभिलेख कार्यालयातील एका नीमतानदाराला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडी (ता.पाथरी) येथील ६३ वर्षीय तक्रारदार यांच्या पुतण्याची शेती जमीन ढालेगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमध्ये गेल्याने पुनर्वसनासाठी भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करण्यात आली होती. मात्र संबंधित जमिनीची मोजणी कमी झाल्याचा आरोप करत पुनर्मोजणीसाठी अर्ज करण्यात आला होता. या कामासाठी पाठपुरावा सुरू असताना संबंधित कार्यालयातील नीमतानदार रामेश्वर गुरुलिंगप्पा बिडकर याने तक्रारदाराकडे तब्बल १५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

तक्रारीची गंभीर दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ पडताळणी केली. फोनवरील संभाषणातून आरोपीने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. पुढील दिवशी पुन्हा पडताळणी करताना पंचासमक्ष आरोपीने तडजोडीअंती १२ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर बुधवारी (दि.८) सकाळी सापळा रचण्यात आला.

पाथरी येथील साई मंदिर रोडवरील राऊत यांच्या कटिंग दुकानासमोर आरोपीने तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात जेरबंद केले. कारवाईनंतर आरोपीची अंगझडती घेण्यात आली असून त्याच्याकडील मोबाईलची तपासणी सुरू आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी हे तपास करीत आहेत. दरम्यान, या धडक कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीवर आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून नागरिकांनी अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news