Taking advantage of the huge crowd during the Ganesh Visarjan procession, thieves looted women's jewelry
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गणेश विसर्जन मिरवणुकीतील अलोट गर्दीचा फायदा घेत चोरांनी महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या घटना शहरात ठिकठिकाणी उघडकीस आल्या आहेत. विसर्जनासाठी गेलेल्या तब्बल सहा महिलांचे मंगळसूत्र गर्दीत कापण्यात आले, तर हर्मूल भागात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. याप्रकरणी क्रांती चौक, सिटी चौक आणि हसूल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व घटनांमुळे सणासुदीच्या काळात महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते औरंगपुरा या मुख्य विसर्जन मार्गावर शुक्रवारी (दि. २५) रात्री ८ ते ११ वाजेच्या दरम्यान प्रचंड गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ५ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हातोहात कापून नेले. यामध्ये सुशीला गोपाल मेहरा (६२, रा. पद्मपुरा) यांचे २ तोळ्यांचे मंगळसूत्र, ममता जयवंत पुजारी (५५, रा. कर्णपुरा) यांचे ६ ग्रॅमचे, योगिता विजय जाधव (३७, रा. बहादूरपुरा) यांचे ३ ग्रॅमचे, दिशा शिवाजी पाटेकर (४६, रा. बायजीपुरा) यांचे ३ ग्रॅमचे आणि मुक्ताबाई दिलीप शिंदे (३२, रा. शरणापूर) यांचे ३ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. चोरट्यांनी एकूण ३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे आणि १ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले असून, याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मंगल सांडुजी भुजंगे (४४, रा. दीक्षाभूमीनगर, हसूल) या शनिवारी (दि. २६) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या नातवाला ट्यूशनवरून घरी घेऊन जात होत्या. हसूल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, सरकारी दवाखान्यासमोरून चालत असताना समोरून एका दुचाकीवर दोघेजण आले.
दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्याने मंगल यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण हिसकावून तोडून नेले आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एन-१२ विहिरीजवळ महिलेचे मंगळसूत्र लंपास
दुसऱ्या एका घटनेत, विसर्जनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील ३.५ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एन-१२ येथील श्री गणेश विसर्जन विहीर परिसरात घडली. फिर्यादी कमल बाबासाहेब नलावडे (५६, रा. एन-११, मयूरनगर) यांच्या तक्रारीवरून सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.