Take timely action against nylon manja
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
पतंगासाठी नायलॉन मांजा सर्रास वापर करण्यात येत आहे.. यावर्षी आत्ताच मकर संक्रांतीचे वेध लागल्याने शहरात विविध ठिकाणी पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. पोलिस प्रशासनाने वेळीच नायलॉन मांजा वापरण्यावर कारवाई करावी. ८ डिसेंबरपासून याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती लाईफ केअर ऍनिमल वेल्फेअर असोसिएशनचे जयेश शिंदे यांनी दिली.
मकर संक्रांत येण्याआधीच शहरातील सिडाके एन-६, सेंट्रल नाका, कटकटगेट, रोशनगेट, शहा बाजार, गणेश कॉलनी, शहागंज, दिल्लीगेट, चेलीपुरा, अशा अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. यावेळी नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे या संस्थेच्या वतीने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांना गंभीर जखमी व्हावे लागले आहे. तर काहींचा जीव गमवावा लागला आहे.
अशा गंभीर घटना घडण्याआधीच पोलिस प्रशासनाने नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करण्याची मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.