T-55 tank unveiled at Kargil Memorial Park
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात शनिवारी कारगिल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल स्मृती उद्यानात बसविण्यात आलेल्या टी ५५ रणगाड्याचे लोकार्पण करण्यात आले. ऑपरेशन सिंदुर संकल्पनेवर आधारित आणखी एक उद्यान शहरात उभारले जाईल, असे इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास मंत्री अतुल सावे, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी नगरसेवक पंकज भारसाखाळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी शहीद स्तंभाला मानवंदना अर्पण करण्यात आली आणि नंतर भारतीय सैन्याने दिलेल्या टी-५५ रणगाड्याचे लोकार्पण मंत्री अतुल सावे यांनी केले. या सोहळ्यासाठी सुमारे १२ शाळांमधील २४०० विद्यार्थी, शिक्षक, माजी सैनिक, वीर माता, वीरपत्नी तथा शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारगिल युद्धाच्या संकल्पनेवर आधारित हे महाराष्ट्रातील पहिलेच उद्यान आहे. येथे थिएटर उभारले जाणार आहे जे कारगिल युद्धावर आधारित चित्रपट पाहण्यास सोयीचे ठरेल. कारगिल युद्धात सहभागी झालेल्या मराठवाड्यातील सैनिकांच्या शौर्याचे दर्शन घडवणारी गॅलरीही येथे पूर्णत्वाकडे जात आहे, अशी माहिती समितीने दिली.
कारगिल स्मृती वन समितीने विविध युद्ध प्रसंगादरम्यान कायमचे अपंगत्व आलेल्या सैनिकांचा यावेळी सन्मान केला. यात सैनिक सुभाष जाधव, दत्तात्रय जाधव, रामदास बनसोड, भाऊसाहेब शिंदे आणि रमेश साळवे यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय माजी सैनिक कॅप्टन सुरेंद्र सुर्वे, विंग कमांडर टी. आर. जाधव, कर्नल काटकर, कर्नल सोनवणे आणि कमांडर अनिल सावे यांचा सत्कार करण्यात आला.