Suspense of Sevenhill Lemontree road width continues?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना रोड सेव्हनहिलहून चिकलठाण्यापर्यंत महापालिका, सिडको आणि एमआयडीसी या तीन विकास यंत्रणांकडे येतो. त्यामुळे सेव्हनहिलपासून लेमनट्रीपर्यंत हा रस्ता ४५ मीटर रुंदीचा आहे की, ६० मीटर याबाबत तिन्ही यंत्रणांनी संयुक्त बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असे आदेश खंडपीठाने दिले. परंतु, अद्यापही बैठक झाली नसल्याने याबाबतचे सस्पेन्स कायमच आहे.
महापालिकेने शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांवर नियमांना बगल देत बेधडकपणे मोहीम राबविली. यात रुंदीकरणाआड येणारी घरे, दुकाने, शेड, इमारती, हॉटेल्स पत्त्यांच्या महलाप्रमाणे भुईसपाट केल्या. जालना रोडवर तर ही मोहीम बावा ते सेव्हनहिल आणि एपीआय कॉर्नर ते केंब्रीज शाळा चौक यादरम्यानच्या रस्त्यावर राबविण्यात आली. परंतु, पथक सेव्हनहिल ते लेमनट्री रस्त्याजवळ आले. अन् महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना मग बांधकाम परवानगी, नोटीस, मार्किंग, रस्त्याची रुंदी तपासणे आणि कायदेशीर कारवाईसह नियमानुसार मोहीम राबवावी लागते, हे आठवले.
त्यामुळे या पाडापाडीला ब्रेक देत आता रस्ता नेमका किती रुंदी यावरच मागील दोन आठवड्यांपासून खल सुरू आहेत. सेव्हनहिलहून चिकलठाण्याकडे जाणाऱ्या बाजूने असलेली जागा ही एमआयडीसी, सिडको आणि महापालिका या तिन्ही यंत्रणांच्या आहेत. त्यामुळे या यंत्रणांकडून जागा घेतल्यानंतर त्यांनीच संबंधितांना जागा धारकांना बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे या यंत्रणांनी किती मीटर रुंदीचा रस्ता गृहीत धरून बांधकाम परवानगी दिली. याबाबत माहिती घेण्यासाठी तिन्ही यंत्रणांनी संयुक्त बैठक घेऊन त्याबाबत तोडगा काढण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. या आदेशाला आता आठवडा होत असून अद्यापही महापालिका, एमआयडीसी, सिडको या तिन्ही यंत्रणांची संयुक्त बैठक झाली नाही. त्यामुळे सेव्हनहिल ते लेमनट्री रस्त्याची रुंदी नेमकी किती, याबाबतचे सस्पेन्स कायम आहे.
चंपाचौक ते जालना रोड हा नियोजित रस्ता जुन्या आराखड्यात जालना रोडपर्यंत ३० मीटर रुंदीचा आहे. परंतु, नव्या विकास आराखड्यात हा रस्ता चंपाचौक ते जिन्सीपर्यंत ३० मीटर आणि तेथून पुढे जालना रोडपर्यंत १८ मीटर रुंदीचा केला आहे. या बदलावर महापालिकेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महापालिका जुन्या आरखड्यानुसारच रस्ता तयार करणार आहे. तसेच जालना रोडचेही होणार का?
खंडपीठाच्या आदेशाने महापालिका, सिडको आणि एमआयडीसी या तिन्ही यंत्रणांची संयुक्त बैठक स्थानिकस्तरावर होणार नाही. ही बैठक आता मुंबईत होईल, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी शनिवारी झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत सांगितले. त्यामुळे आता या बैठकीकडे लक्ष लागले आहे.