Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Verul Teacher Death : शिक्षक मृत्यू प्रकरणाचा तपास थेट 'सीआयडी'कडे वर्ग

संपूर्ण प्रकरणाची मुळापासून चौकशी होणार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील निष्पाप शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या संतापजनक घटनेत थेट पोलिसांचाच सहभाग आणि गंभीर निष्काळजीपणा असल्याचा आरोप झाल्याने, या गुन्ह्याचा पुढील तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. यामुळे आता या प्रकरणातील आरोपी पोलिसांसह तथाकथित वाळूमाफियांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

वैजापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबतच्या खासगी टोळक्याने केलेल्या मारहाणीत बुधवारी (दि.१०) शिक्षक बोरसे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वैजापूरचे उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मीक बनगे यांना पोलिस अधीक्षकांनी निलंबित करून नागरगोजे याला अटकही करण्यात आली होती.

तसेच आरोपी रवींद्र रखमाजी आवारे (३४), ओंकार बाबूराव चौधरी (२४), बाळू विश्वनाथ डमाळे (४२, सर्व रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) आणि सोपान अशोक चोथे (२७, रा. नालगाव, ता. वैजापूर) या चौघांनही अटक झाली होती. मात्र आरोपींना अवघ्या काही तासांत जामीन मिळाला होता.

या प्रकरणात खुद्द पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडून होणाऱ्या तपासाच्या पारदर्शकतेवर साहजिकच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, तपासात कोणतीही त्रुटी राहू नये आणि बोरसे कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. सीआयडीच उपअधीक्षक पिंगळे हे आता या संपूर्ण प्रकरणाच्च मुळापासून आणि त्रयस्थपणे चौकशी करणार असल्याच सूत्रांनी सांगितले.

कोणते मुद्दे असणार रडारवर ?

खाजगी टोळक्याचा सहभाग: तपासासाठी जाताना पोलिसांनी खासगी व्यक्तींना (वाळूमाफिया) सोबत का नेले आणि त्यांना नेमके कोणाचे संरक्षण होते ?

कलमांची पळवाट : सुरुवातीला अज्ञातांवर गुन्हा दाखल करून आणि नंतर किरकोळ कलमे लावून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला का? पोलिसांवर कोणाचा दबाव होता ?

घटनाक्रम : प्रत्यक्षदर्शीचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांची (व्हायरल व्हिडिओ) सीआयडी नव्याने पडताळणी करेल.

मारहाणीत मृत्यू ? : शिक्षक बोरसे यांना आरोपींनी बेदम मारहाण करत गाडीमध्ये डांबून घेऊन जात होते, असे कुटुंबीयांचे आरोप आहेत. त्यामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला का? याचाही तपास होऊ शकतो.

सीआयडी स्थानिक पोलिसांकडून तपासाची कागदपत्रे हस्तगत करून आरोपी पोलिसांची चौकशी करू शकते. त्यामुळे तपासात आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT