Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : विवाहित असल्याचे लपवून महिलेशी जवळीक

सत्य समोर येताच संबंध तोडल्याने फोटो केले व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : स्वतःचे लग्न झालेले असून दोन मुले असल्याची माहिती लपवून शहरातील एका महिलेशी जवळीक साधणाऱ्या सुरतच्या एका तरुणाचे बिंग फुटले. सत्य समोर आल्यानंतर महिलेने त्याच्याशी संबंध तोडले. याचा राग आल्याने तरुणाने दारूच्या नशेत महिलेच्या घरी जाऊन तिला व तिच्या मुलांना मारहाण केली. 'शारीरिक संबंध ठेव, असे धमकावत फोटो व्हायरल केले. हा प्रकार बुधवारी (दि.१७) औरंगपुरा भागात घडला. विक्रम सुरेशभाई राठोड (रा. सुरत, गुजरात) याच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगपुरा परिसरातील बढाई गल्लीत राहणारी फिर्यादी महिला आणि आरोपी विक्रम राठोड यांची एकमेकांशी ओळख होती. मात्र, विक्रम हा विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची बाब त्याने महिलेपासून लपवून ठेवली होती. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने विक्रमला जाब विचारला. 'तू माझ्याशी खोटे बोलून माहिती लपवली आहेस, त्यामुळे इथून पुढे आपला काहीही संबंध नाही. तू तुझ्या गावी निघून जा', असे महिलेने त्याला स्पष्टपणे सुनावले.

यावेळी महिलेच्या मोठ्या बहिणीनेही त्याला समजावून सांगितले होते, त्यानंतर तो तेथून निघून गेला. १७ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आरोपी विक्रम दारू पिऊन महिलेच्या घरी आला. त्याने पीडिता आणि तिच्या मुलांना मारहाण केली.

या त्रासाला कंटाळून महिलेने क्रांतीचौक पोलिसांत अदखलपात्र (एन.सी.) तक्रार दिली होती. मात्र, त्यानंतरही आरोपीचा त्रास थांबला नाही. त्याने महिलेला सतत फोन करून धमकावण्यास सुरुवात केली.

'मला अनब्लॉक कर, नाहीतर तुझ्या अख्ख्या खानदानाला आपल्याविषयी सांगेन. माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, नाहीतर दोघांचे फोटो व्हायरल करून बदनामी करेन', अशा धमक्या तो देऊ लागला.

फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बदनामी

महिलेने त्याला दाद न दिल्याने आणि अनब्लॉक न केल्याने त्याने मेसेज करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याने स्वतःच्या आणि महिलेच्या नावाचा उल्लेख असलेला एक नवीन इन्स्टाग्राम आयडी बनवला. त्यावर महिलेसोबतचे काही फोटो पोस्ट करून तिची समाजात बदनामी केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक पटेल या करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT