Sambhajinagar Water Supply : ९०० च्या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणी द्या File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Water Supply : ९०० च्या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणी द्या

महापालिकेचे एमजेपीला पत्र, ७०० च्या जलवाहिनीचा पुरवठा बंद

पुढारी वृत्तसेवा

Supply water at full capacity through the 900mm pipeline.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे पुनरुज्जीवन करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान नव्याने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली आहे. यातून दीड वर्षापासून २२ एमएलडी क्षमतेने शहरात पाणी आणले जात आहे. परंतु महापालिकेने आता ७०० च्या जलवाहिनीचा पुरवठा पूर्णतः बंद केला आहे. त्यामुळे ९०० तून पूर्णक्षमतेने (म्हणजेच ७२ एमएलडी) पाणीपुरवठा सुरू करावा, असे पत्र बुधवारी (दि.१८) महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला दिले आहे.

अमृत योजनेतून शहरासाठी मंजूर झालेल्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेनंतर राज्य शासनाने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी मंजूर केली होती. ही योजना जुनी ७०० मिमीच्या जुन्या जलवाहिनीचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने मंजूर केली होती. या योजनेसाठी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने जलश-द्धीकरण केंद्रही उभारण्यात आले आहे.

हे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी जलवाहिनी उभारणीसह जलशुद्धीकरण केंद्राचे काम तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांना देण्यात आले होते. त्यात ३९ किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्याचे काम अर्धे अर्धे दोन कंत्राटदारांना विभागून देण्यात आले.

दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून शहरासाठी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पहिल्यांदा या जलवाहिनीतून १५ एमएलडी पाणी आणले जात होते. परंतु फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील या योजनेसाठी आवश्यक जलशुद्धीकरण केंद्र सुरू केल्याने ९०० तून २२ ते २६ एमएलडीपर्यंत पाणी शहरात आणले जात आहे. आता या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने म्हणजेच ७० एमएलडीहून अधिक पाण्याची उचल करावी, अशी सूचना महापालिकेचे शहर अभियंता संजय कोंबडे यांनी पत्राद्वारे एमजेपीचे कार्यकारी अभियंत्यांना केली आहे. १८ मार्चपासूनच ७०० मिमीच्या जलवाहिनीचा पुरवठा पूर्णतः बंद केल्याने १९ मार्चपासून ९०० तून पूर्ण क्षमतेने पाणी देण्याबाबत सांगितले आहे.

७०० ने तब्बल ५४ वर्षे भागविली तहान

शहराच्या जुन्या वसाहतींची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९७२ साली ७०० मिमी जलवाहिनी टाकली होती. तब्बल ५४ वर्षांपासून शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या या जलवाहिनीला अखेर महापालिका आणि एमजेपीने सेवेतून निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी या जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करून त्याचा भार पूर्णतः ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर टाकण्यात आला आहे.

३ ग्रा.पं.चे कनेक्शन ९०० वर

जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडीदरम्यान ढोरकीन, इसारवाडी आणि धनगाव या तीन ग्रामपंचायतींना ७०० मिमी च्या जलवाहिनीतूनच पुरवठा केला जातो. त्याचे सर्व कनेक्शन हे आता ९०० च्या जलवाहिनीवर घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT