नाल्यालगतच्या विहिरीतील दूषित पाण्याचा घराघरांत पुरवठा file photo
छत्रपती संभाजीनगर

Contaminated Water : नाल्यालगतच्या विहिरीतील दूषित पाण्याचा घराघरांत पुरवठा

मोतीवालानगर, छावणी, रेल्वेस्टेशन, शहाशाक्ता कॉलनी, मुकुंदवाडीतील विहिरीत सांडपाणी

पुढारी वृत्तसेवा

Supply of contaminated water from a well adjacent to a drain to households

मुकेश चौधरी

छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाढत्या पाणीटंचाईचा फायदा घेत खासगी टैंकर व्यवसायाने धोकादायक वळण घेतल्याचे समोर आले आहे. मोतीवालानगर, छावणी, रेल्वेस्टेशन परिसर, शहाश-ाक्ता कॉलनी आणि मुकुंदवाडी या भागांतील अनेक विहिरी नाल्यांच्या अगदी काठावर असून त्या थेट सांडपाण्याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. या विहिरींमधून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसून ते टँकरद्वारे नागरिकांना पुरवले जात असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

खासगी टैंकर चालकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू केला असून मोतीवालानगर, छावणी, रेल्वेस्टेशन, शहाशाक्ता कॉलनी, मुकुंदवाडीतील नाल्यालगतच्या विहिरीमधील दूषित पाणी आसपासच्या वसाहतीतील घराघरांत पोहवले जात आहे.

प्रत्यक्ष पाहणीत या भागांतील विहिरीच्या आजूबाजूला कचरा, गाळ आणि अस्वच्छता साचलेली दिसून आली. तसेच मोटारपंपांच्या साहाय्याने या विहिरींमधून थेट टँकरमध्ये पाणी भरले जात असून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता हे पाणी शहरातील विविध भागांत पाठवले जात आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेत पाण्याच्या गुणवत्तेची कोणतीही तपासणी होत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी प्रतापनगर, जवाहार कॉलनी, उस्मानपुरा आणि पन्नालालनगर परिसरातही अशाच प्रकारे नाल्यालगतच्या विहिरींमधून पाणी उपसले जात असल्याचे समोर आले होते. त्याच पद्धतीचा वापर या भागांमध्येही सुरू असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. दरम्यान पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या टैंकर भरण्याच्या प्रक्रियेमुळे दररोज हजारो लिटर संशयित पाणी शहरात वितरित होत आहे.

महापालिकेकडून होणारा अनियमित पाणीपुरवठा ही या समस्येची मुख्य कारण ठरत आहे. पाणीपुरवठा वेळेवर न झाल्याने नागरिकांना टैंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, या पाण्याचा स्रोत व गुणवत्ता याबाबत कोणतीही अधिकृत नोंद किंवा नियंत्रण यंत्रणा नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

शहरात टँकरद्वारे पुरवले जाणारे पाणी सुरक्षित आहे की नाही, याबाबत कोणतीही हमी नसल्याचे यातून दिसून आले आहे. नाल्यालगतच्या विहिरींमधून उपसलेले पाणी थेट वापरासाठी दिले जात असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, ताप, त्वचारोग यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. पाण्याच्या स्रोतांची तपासणी, शुद्धीकरणाची सक्ती आणि टैंकर व्यवसायावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे खासगी टँकरचालकांचा धंदा तेजीत असून पाणी तहानलेल्या नागरिकांना नाल्याचे पाणी पुरवले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT