Maharashtra's first woman Chief Secretary Sujata Saunik
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक file photo
छत्रपती संभाजीनगर

सुजाता सौनिक यांचा संभाजीनगरातून करिअरला प्रारंभ

मोहन कारंडे
उमेश काळे

छत्रपती संभाजीनगर : आयएएसचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या करिअरची सुरवात करणार्‍या सुजाता सौनिक (चिमा) या राज्याच्या मुख्य सचिवपदावर विराजमान झाल्या आहेत. त्यांचे पती मनोज सौनिक यांनी सुद्धा जालन्यात जिल्हाधिकारी पद भूषविले होते.

२७ मे १९८८ ते २३ ऑगस्ट १९८९ या काळात सुजाता सौनिक यांनी संभाजीनगरात प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी पदाचा अनुभव घेतला. या कालावधीत अधिकार्‍यांना विविध विभागांचे काम करावयाचे असते, तसेच कार्यपद्धती समजवून घेणे हा भाग महत्वाचा असतो. तत्कालिन विभागीय आयुक्‍त अरूण बोंगिरवार, जिल्हाधिकारी राजीव सिन्हा यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सिन्हा यांच्याकडे महापालिका आयुक्‍त प्रभारी पदाची जबाबदारी होती. तेव्हा त्यांनी पालिका कामकाजाचाही अनुभव घेतला. पुढे सप्टेंबर १९८९ ते ऑगस्ट १९९० या काळात त्यांनी या पदाची पूर्णवेळ जबाबदारी सांभाळली. यावेळी संभाजीनगरात निर्माण झालेल्या धार्मिक तणाव निपटण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर दीड वर्ष त्यांनी जालन्यात जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले. तेव्हा त्यांचे पती जालन्याचे जिल्हाधिकारी होते.

संभाजीनगरात काम केलेल्या 'या' अधिकाऱ्यांचा प्रशासकीय सेवेत ठसा

यापूर्वी संभाजीनगरात विभागीय आयुक्‍तपदावर काम केलेल्या अरूण बोंगिरवार यांना १९९९ ते २००१ या कालावधीत मुख्य सचिवपदाची जबादारी सोपविण्यात आली होती. तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे स्विय सचिव म्हणून ते कार्यरत होते. बोंगिरवार हे प्रारंभी धाराशिवचे जिल्हाधिकारी होते हे विशेष. २००९-११ या काळात असणारे जे. पी. डांगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्‍तालयात अप्पर आयुक्‍त म्हणून काम केले होते. सचिव पदावर २०१३ ते १४ मध्ये असणारे जे. एस. सहारिया यांनीही काही काळ अप्पर आयुक्‍त म्हणून जबाबदारी सांभाळली होती. १ जुलै २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मुख्य सचिव म्हणून काम केलेले संजयकुमार हे संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्‍त म्हणून कार्यरत होते. संभाजीनगरात जिल्हाधिकारी असताना तेव्हाचे उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांना मुंबईत बोलावून आपल्या सचिवपदी नेमले होते. या सर्वच अधिका-यांनी राज्यातील प्रशासकीय सेवेवर आपला ठसा उमटविला असला तरी बोंगिरवार यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते.

SCROLL FOR NEXT