Sujat Ambedkar pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sujat Ambedkar| जातीयवाद असेल तोपर्यंत आरक्षण राहणार : आंबेडकर

मुंबई आयआयटीचा विद्यार्थी साहिल वाकोडे याला वाहिली श्रद्धांजली

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : देशात आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत. समाजात जातीयवाद असेल तोपर्यंत आरक्षण राहणार आहे. जातीयवादाच्या विरोधात आरक्षण हेच संरक्षण आहे. या संघर्षात युवा पिढी एकटी नसून आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे प्रतिपादन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मंगळवारी (दि.२९) संत एकनाथ रंगमंदिर येथील जय भीम जेन-झी या कार्यक्रमात केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी संत एकनाथ रंगमंदिर येथे जय भीम जेन-झी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात युवा नेते सुजात आंबेडकर यांनी तरुणाईशी शिक्षण, रोजगार, आरक्षण, सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर संवाद साधला. मुंबई आयआयटीचा विद्यार्थी साहिल वाकोडे याला श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर जेन-झी रस्त्यावर उतरली. या आंदोलनानंतर अचानक आरक्षण हटाव आंदोलन सुरू झाले. आजही दलित, ओबीसींना जातीवरून हिणवले जाते. दलित प्रगती करून यांची बरोबरी करतील, अशी भीती वाटत आहे का असा सवाल आंबेडकर यांनी केला.

आरक्षण बंद केले तरी यांच्या मनातील जातीयवाद संपणार नाही. आरक्षण हे गरीब हटाव कार्यक्रम नसून सामाजिक समतेसाठी असल्याचे सुजात यांनी सांगितले. दरम्यान, व्हीआयपी धीस साइडचे रॅप साँग सादर झाले. उत्कर्षा यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपत्तीमधील आरक्षण हटवा

देशात २८ टक्के लोकसंख्या असलेल्या उच्चवर्णीयांकडे देशाची ५५ टक्के संपत्ती आहे. कॉर्पोरेट कंपन्यात ९२ टक्के जागा, केंद्रीय विद्यापीठात ५५ टक्के प्रोफेसर आणि मीडियात ८८ टक्के जागा उच्चवर्णीयांकडे आहेत. या आरक्षणावर कुणी बोलत नाही. सफाई कामगारात ९७ टक्के दलित आहेत. आरक्षणावर एकदा खरी मांडणी करा, असे आंबेडकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT