Submit a proposal to build a working women's hostel, old age home!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महिलांचे सुरक्षा कवच आणि ज्येष्ठांचे आधारस्थान ही शासनाची जबाबदारी असून, शहरात वर्किंग वुमेन्स होस्टेल आणि ओल्ड एज होम उभारण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करा, असे स्पष्ट निर्देश गुरुवारी (दि.४) गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी म्हाडाला दिले.
म्हाडाच्या कामकाजाचा डॉ. भोयर यांनी आज सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले, उपमुख्य अधिकारी जयकुमार नामेवार, कार्यकारी अभियंता सुधाकर बाहेगव्हाणकर यांच्यासह मंडळातील विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आढावा बैठकीत सांगितले की, शहरातील वाढत्या गरजांचा विचार करून म्हाडाकडून शहरात वर्किंग वुमेन्स होस्टेल, ओल्ड एज होम उभारण्यात येणार आहे. महिलांना सुरक्षित निवास तसेच ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक जगण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने पावले उचलली असून, त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करा. या प्रकल्पांसाठी निधी ते सुविधांपर्यंत सर्वतोपरी मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी म्हाडाच्यावतीने सुरू असलेल्या व प्रस्तावित योजनांचा, पीएमएवाय आणि २० टक्के प्रकल्पांच्या प्रगतीचा, पूर्ण झालेल्या घरकुल योजनांचा तसेच गाळे, सदनिका, दुकाने आणि अनिवासी भूखंडांच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी काम विलंबित करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले.
महसुली जमा निधी, प्रकल्पांची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील महसूलवाढीची दिशा यावरही चर्चा झाली. जिल्ह्यातील उपलब्ध शासकीय जागांपैकी किती भूखंड म्हाडाच्या प्रकल्पांसाठी वापरता येऊ शकतात, याचा तपशील तयार करून अधिकाधिक योजना राबवण्याचे निर्देश दिले. शहरातील गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे गतीने राबवली जातील, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.