

Autorickshaw transporting beef vandalized by mob
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
गोमांस वाहतूक करणाऱ्या प्रवासी ऑटो - रिक्षाला गोरक्षकांनी शुक्रवारी (दि.५) सकाळी वाळूज एमआयडीसीत थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने रिक्षा न थांबवता तो पुढे घेऊन जात असताना गोरक्षकांसह जमावाने पाठलाग करून रिक्षा थांबवून तिची तोडफोड केली. यावेळी जमावाने अंबेलोहळ येथील कत्तलखान्यावर कारवाईची मागणी करत रस्त्यावर तासभर ठिय्या आंदोलन केले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वाळूज एमआयडीसीतून एका ऑटो रिक्षामधून गोमांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती शुक्रवारी गोरक्षकांना मिळाली होती. सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास त्यांना विटावा फाट्याकडून प्रवासी वाहतूक करणारी ऑटो रिक्षा येत असल्याचे दिसून आले. यावेळी गोरक्षकांनी रिक्षा चालकास रिक्षा थांबविण्यास सांगितले, मात्र तो जोगेश्वरीच्या दिशेने रिक्षा सुसाट घेऊन जात असताना गोरक्षकांनी विप्रो कंपनीसमोर रिक्षा थांबविली व त्यांनी रिक्षाची तपासणी केली असता रिक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याचे दिसून आले.
दरम्यान, याठिकाणी जमा झालेल्या जमावाने रिक्षाची तोडफोड केली. अंबेलोहळ येथे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कारवाई करा, अशी मागणी करत त्यांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे, संजय गिते अमंलदारांनी यांच्यासह पोलिस घटनास्थाथळी घेतली.
यावेळी पो.नि. गाडे यांनी गोरक्षक अमितकुमार सिंग, शंकर सूर्यवंशी, सुरेश कांबरा, देवा राणे, शुभम पडघन, धोंडीबा मोटे, रविकुमार पाटील, विवेक मोठे, ओम घोडके यांच्यासह जमावाची समजूत काढत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव पांगला. पोलिसांनी रिक्षा चालक हबीब हशम शेख (३८) व कमरूबी जलाल सय्यद (६०, दोघे रा. अंबेलोहळ) यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील ऑटो रिक्षा, रिक्षामधील ११० किलो गोमांस, चार सुरे असा जवळपास २ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिस अंमलदार योगेश गोमलाडू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.