Bribe Case pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Bribe Case : आर्थिक गुन्हे शाखेचा उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे 'एसीबी'च्या जाळ्यात

फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपींना पकडण्यासाठी ५० हजारांची लाच

पुढारी वृत्तसेवा

Sub-inspector Chandrakant Kamthe of the Economic Offences Wing is caught by the ACB

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एका सेवानिवृत्त पोलिसाने दिलेल्या अर्जावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आणि त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून मदत करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागणारा आर्थिक गुन्हे शाखेचा उपनिरीक्षक चंद्रकांत हनुमंत कामठे (३८, रा. सातारा परिसर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. लाचेची मागणी सिद्ध झाल्याने त्याला सोमवारी (दि. २७) पोलिस आयुक्तालयातून ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, तक्रारदाराने फसवणूक झाल्याबाबतचा एक तक्रार अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता. या अर्जाची चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करून गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे याने तक्रारदाराकडे २७ फेब्रुवारी रोजी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने ११ मार्च रोजी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यात उपनिरीक्षक कामठे याने फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचे बक्षीस आणि आरोपींना अटक करून मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे व तडजोडीअंती ती रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. यानंतर कामठे याला संशय आल्याने त्याने तक्रारदाराला भेटण्यास टाळाटाळ सुरू केली. मात्र पंचांसमक्ष लाचेची मागणी सिद्ध झाल्याने एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि. २७) उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे याला ताब्यात घेतले.

कामठेच्या सातारा परीसारतील घराची झडती

त्याच्या सातारा परिसरातील घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे, उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, तपास अधिकारी चैनसिंग गुसिंगे, अंमलदार रवींद्र काळे व विलास चव्हाण यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT