

पैठण :- मराठवाड्यातील शेती सिंचनासह औद्योगिक वसाहतीला वरदान ठरलेल्या पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात सोमवारी दि.२७ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत वरील धरणातून पाण्याची मोठ्या गतीने आवक होत असल्याने धरणाची पाणी पातळी ५८.१२ टक्के झाली असून, धरणामध्ये ५६ हजार २९० क्युसेक आवक सद्यस्थितीत सुरू आहे.
रात्रीतून या जायकवाडी प्रकल्पात ६० टक्क्याहून अधिक पाण्याची टक्केवारी नोंद होणार असल्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या सूत्राने व्यक्त केली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, या पुराचे पाणी पैठण येथील जायकवाडी धरणात मोठ्या वेगाने दाखल होत आहे. सोमवारी रोजी सायंकाळी सहा वाजता धरणात सुमारे ५६ हजार २९० क्युसेक या वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याने हे जायकवाडी प्रकल्प पाणी पातळी ५८.१२ टक्के नोंद धरण नियंत्रण कक्षात करण्यात आली.
या वाढलेल्या व येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता रात्रीपर्यंत या प्रकल्पात ६० टक्क्याच्या अधिक पाण्याची पातळी नोंदवली जाणार असल्याची शक्यता पाटबंधात विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून, मोठ्या प्रमाणात पाणी धरणाकडे येत आहे, धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याने मराठवाड्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, आगामी खरीप हंगामासाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने ही आवक दिलासादायक असल्याचे शेतकऱ्याचे मत आहे.