Students Protest : पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरात एल्गार file photo
छत्रपती संभाजीनगर

Students Protest : पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरात एल्गार

जोपर्यंत राजीनामा नाही, तोपर्यंत मैदान सोडू नका : अभिजीत दिपके

पुढारी वृत्तसेवा

Students in Chhatrapati Sambhajinagar raise a strong protest against the paper leak

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे राज्यभरातील लाखो तरुणांचे भविष्य अंधारात सापडल्याचा आरोप करत, याविरोधात शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी रविवारी सायंकाळी (दि.२०) जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावून थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला, जोपर्यंत एमपीएससीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेऊ नका, असे आवाहान विद्यार्थ्यांना केले.

दिपके पुढे म्हणाले की, राज्यभरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ ते २० लाखांच्या घरात आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मते गृहीत धरल्यास ही संख्या सुमारे सव्वा ते दीड कोटींवर पोहोचते. सरकारला केवळ मतांची भाषा समजते; त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून ही ताकद दाखवून दिली पाहिजे असेही दिपके म्हणाले.

तसेच दिल्लीतील आंदोलनात, तिथे लाठीचार्ज, डोकी फुटणे आणि गंभीर दुखापती होऊनही आंदोलक मागे हटले नाहीत, ज्यामुळे शेवटी सरकारला झुकावे लागले होते, असेही ते म्हणाले. दरम्यान सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला आहे.

एकजुटीचे आवाहन आणि लढ्याची तयारी

पुणे, विदर्भ आणि मराठवाडा अशा वेगवेगळ्या भागात विखुरण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले. हा लढा आठवडाभर चालेल की महिनाभर, याची पर्वा न करता शेवटपर्यंत टिकून राहण्याची तयारी ठेवा, मी स्वतः तुमच्यासोबत बसून राहीन, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सोशल मीडियावर रणनीती आखण्याचे आवाहन

आंदोलनाचा आवाज अधिक प्रभावी करण्यासाठी केवळ टेलिग्रामपुरते मर्यादित न राहता इन्स्टाग्रामवर लहान व्हिडिओ बनवून एमपीएससी अध्यक्षांच्या गैरव्यवहारांवर थेट प्रश्न उपस्थित करावेत, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, भीमनवार राजीनामा द्या. अशा घोषणांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचा परिसर दुमदुमून गेला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली टीका

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. सकाळच्या शपथविधी, खुर्चीप्रेम तसेच आमदार फोडण्यासाठी सूरत-गुवाहाटी व हॉटेल-रिसॉर्टवरील कथित खर्चाचा आरोपांचा उपरोधिक उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला. पुन्हा येईन या घोषणेवरही चिमटा काढत, विद्यार्थ्यांचे ऐकले नाही तर पुन्हा येणे शक्य होणार नाही, असे ते म्हणाले. केंद्रात जाण्याची घाई असल्यास आधी विद्यार्थ्यांचे ऐकून राजीनामा द्यावा; केंद्रात पाठविण्यासाठी आम्हीच प्रमोशन करू, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT