Street lights on flyovers of Kannada National Highway are off
कन्नड, पुढारी वृत्तसेवा :
महावितरण विभागाच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्नणपुलांवर बसविण्यात आलेले पथदिवे वीज बिल थकल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी वाहनधारकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः अंधारामुळे अपघाताची शक्यता वाढत असल्याची भावना वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, कन्नड विभाग अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील सहा ठिकाणांवरील पथदिव्यांचे एकूण सुमारे १ लाख ७८ हजार रुपये इतके वीज बिल थकले होते. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण विभागातील उपव्यवस्थापक राजेंद्रसिंग गिरासे आणि शाखा अभियंता कोळेकर यांनी संबंधित विभागाशी प्रत्यक्ष भेट घेऊन वीज बिल भरण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच अधिकृत मेलद्वारेही बिल तात्काळ भरावे, असे आवाहन करण्यात आले होते.
तथापि, थकबाकी जमा न झाल्याने अखेर महावितरणकडून सहा ठिकाणांवरील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी, उड्डाणपुलांवर रात्रीच्या वेळी अंधाराचे वातावरण निर्माण झाले असून, वाहनचालकांना मार्गक्रमण करताना अडचणी येत आहेत.
स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी लवकरात लवकर थकबाकी भरून पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असल्याने उड्ड ाणपुलांवरील प्रकाशयोजना सुरू राहणे अत्यावश्यक असल्याचेही नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.
महामार्गावरील सहा ठिकाणांवरील पथदिव्यांचे एकूण १ लाख ७८ हजार रुपये इतके वीज बिल थकले आहे. आम्ही त्यांना प्रत्यक्ष वीज बिल भरण्यासाठी सूचना दिल्या. तसेच ईमेल संदेशही पाठवला, मात्र संबंधित विभागाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यात आला.राजेंद्रसिंग गिरासे, उपव्यस्थापक महावितरण कन्नड
अपघाताची भिती
महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांना अपघाताची सतत भिती असते. रात्रीच्या वेळी या मार्गावरुन वाहने भरधाव जात असल्याने समोरील वाहनधारकांना अंदाज येण्यास अडचण येते. अशा परिस्थितीत सतत अपघाताची भिती असते. राष्ट्रीय महामार्गावरील उड्ड-ाणपुलांवर बसवण्यात आलेल्या पथदिव्यांचे वीज बिल त्वरीत भरण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.