छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनेक भागांत रात्री पथदिवे बंद आणि दिवसा मात्र सुरू असल्याने महापालिकेच्या विद्युत विभागाचा कारभार गुरुवारी (दि. २७) सर्वसाधारण सभेत चव्हाट्यावर आला. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी आणि कंत्राटदार दखल घेत नसल्याने नगरसेवकांनी विद्युत विभागाला धारेवर धरले. अखेर महापौर समीर राजूरकर यांनी प्रत्येक प्रभागासाठी एक याप्रमाणे २९ लाईनमन तातडीने नियुक्त करून त्यांचे मोबाईल क्रमांक सर्व नगरसेवकांना देण्याचे आदेश दिले.
महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत गुरुवारी पथदिव्यांचा प्रश्न सर्वाधिक गाजला. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी कंत्राटदाराच्या कामकाजावर गंभीर आक्षेप घेतला. तसेच एजन्सीने बसविलेल्या सेन्सरमध्येच दोष असल्याने अंधार पडल्यानंतर दिवे बंद होत असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढेच नव्हे, तर अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांना भूखंडांची विक्री सुलभ व्हावी, म्हणून निर्मनुष्य ठिकाणी पथदिवे लावले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. तर नगरसेवक रामदास हरणे यांनी सात स्मरणपत्रे देऊनही आपल्या घरासमोरील दिवा अद्याप सुरू झाला नसल्याची खंत व्यक्त केली. महावितरणचे बिल वाढविण्याचा ठेका घेतला आहे का ? असा खोचक सवाल त्यांनी केला.
नगरसेविका माधुरी अदवंत यांनी अंधारामुळे प्रभागात मोठ्या चोऱ्या होत असल्याचे सांगितले. महापालिकेतील माजी कर्मचारी असलेल्या कंत्राटदाराच्या कामावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर महापौरांनी लाईनमनच्या कामासह नगरसेवकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचा मुद्दा त्यांच्या केआरएमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले. निष्क्रिय कंत्राटदाराला सक्त ताकीद देण्याच्या सूचनाही आयुक्त अमोल येडगे आणि कार्यकारी अभियंता यांना दिल्या. दरम्यान, नगरसेवक अली मीर वाजेद यांनी सिद्धार्थ उद्यानातील सीएसआर निधीतून सुरू असलेल्या १० कोटींच्या कामात उघड्या केबल्स टाकल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
बालाजी मुंडे यांनी मुकुंदवाडी-दिपाली हॉटेल रस्त्यावरील पोल शिफ्टिंग व लटकणाऱ्या वायर्सचा प्रश्न मांडला. राजू वैद्य यांनी जानकी हॉटेल-रेणुकानगर मार्गावरील डीपी हटविण्याची मागणी केली. तर सचिन खैरे यांनी गणपती विसर्जनाच्या मुख्य मार्गावरील पोल हटविण्याची मागणी केली. नंदकुमार गवळी यांनी दिवे बंद झाल्यानंतर दुरुस्तीसाठी कंपनीने कोणते वार निश्चित केले आहेत, असा सवाल केला. मून्शी पटेल यांनी भगतसिंग सोसायटीत ५० वेळा सांगूनही दिवे लागले नसल्याचे सांगितले.
रोशनी फेज-२ मध्ये १५,२०० दिवे
रोशनी फेज-२ अंतर्गत १६ हजार पथदिव्यांपैकी १५ हजार २०० दिवे बसविण्यात आले असून ८०० दिवे बसविणे बाकी आहे. कंपनीचा करार ऑक्टोबर २०३० पर्यंत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी दिली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहूळे यांनी एमबी रेकॉर्ड तपासल्यानंतरच कंत्राटदाराचे बिल अदा केले जात असल्याचे स्पष्ट केले.
महेश माळवतकर यांनी एन-९, एन-११ मधील वेळापत्रक आणि टीव्ही सेंटरवरील उंच दिव्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला. ऋषिकेश जैस्वाल यांनी १६ हजार दिवे बसविण्यासाठ टाईम बॉण्ड आहे का, अशी विचारणा केली. रामेश्वर भादवे यांनी लाईनमन काम न करता जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलत असल्याचा आरोप केला आणि गणेशोत्सवात सर्व पथदिवे सुरू ठेवण्याची मागणी केली. तर गणेश लोखंडे यांन नगरनाका-शरणापूर फाटा मार्गावरील दिवे कोण बसविणान आणि जुन्या सोसायट्यांची देखभाल कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला.
शिवाजी दांडगे यांनी कोट्यवधी रुपये खर्चुन उभारलेली चॅटबॉट यंत्रणा केवळ तक्रारी दडपण्यासाठी आहे का, असा संतप्त सवाल केला. यावर कार्यकारी अभियंत मोहिनी गायकवाड यांनी सिद्धार्थ उद्यानातील काम निकृष्ट असल्याचे मान्य केले. कामाचा दर्जा समाधानकारक होईपर्यंत ते हस्तांतरित करून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच महावितरणच्या दुरुस्तीच्या कामामुळे काही ठिकाण दिवसा पथदिवे सुरू राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.