गरोदरपणाच्या कारणावरून महिलेची नियुक्ती रोखणे बेकायदेशीर : खंडपीठ pudhari
छत्रपती संभाजीनगर

गरोदरपणाच्या कारणावरून महिलेची नियुक्ती रोखणे बेकायदेशीर : खंडपीठ

याचिकाकर्त्यांना १९५९ च्या गृह मंत्रालयाच्या नियमावलीनुसार पूर्वलक्षी प्रभावाने नियुक्ती मिळण्याचे आणि त्या अनुषंगाने मिळणाऱ्या सेवाविषयक लाभांचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Stopping a woman's appointment on grounds of pregnancy is illegal: Bench

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गर्भवती असणे हा कोणताही आजार नाही, त्यामुळे केवळ गरोदरपणाचे कारण पुढे करून एखाद्या महिलेची नियुक्ती रोखणे हे तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.

न्यायालयाने या संदर्भातील आदेश रद्द ठरवत याचिकाकर्त्या महिला डॉक्टरला कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले असून, याचिकाकत्र्यांना कामावर रुजू करून घेण्यापूर्वी सीआरपीएफ डीआयजी यांच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या अधीन राहूनच त्यांना नियुक्ती दिली जाणार. याचिकाकर्त्यांना १९५९ च्या गृह मंत्रालयाच्या नियमावलीनुसार पूर्वलक्षी प्रभावाने नियुक्ती मिळण्याचे आणि त्या अनुषंगाने मिळणाऱ्या सेवाविषयक लाभांचा मार्ग मोकळा झाला आहे.

याचिकाकर्त्या डॉ. रेणुका शिवाजी बुणगे यांची केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (ग्रेड-२) या पदावर निवड झाली होती. ८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना नियुक्तीपत्र मिळाले आणि त्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी गेल्या. मात्र, वैद्यकीय तपासणीत त्या १६ आठवड्यांच्या गर्भवती असल्याचे आढळले. स्वामीज मॅन्युअलमधील नियमांचा हवाला देत, सीआरपीएफने त्यांना तात्पुरते अनफिट ठरवले आणि त्यांची नियुक्ती स्थगित ठेवली. या अन्यायाविरुद्ध डॉ. रेणुका यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव यांच्या खंडपीठाने या प्रकरणी महत्त्वाचे मुद्दे मांडले. गर्भधारणा ही कोणतीही शारीरिक व्याधी किंवा आजार नाही. त्यामुळे या कारणावरून नियुक्ती नाकारणे हे राज्यघटनेच्या कलम १४ आणि १६ चे उल्लंघन आहे.

पोलिस अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या कामाच्या स्वरूपात फरक आहे. डॉक्टरांना पोलिसांप्रमाणे कठीण शारीरिक प्रशिक्षणाची तातडीने गरज नसते, त्यामुळे त्यांना गर्भवती असतानाही रुजू करून घेता येते.

याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील व्ही. डी. सपकाळ, अॅड रोहित पाटील यांनी बाजू मांडली, तर केंद्र सरकारतर्फे अजय तल्हार यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT