सिल्लोडला पोलिसांवर दगडफेक File Photo
छत्रपती संभाजीनगर

सिल्लोडला पोलिसांवर दगडफेक

जनावरे पकडल्याचे प्रकरण, शहर ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Stone-pelting on police in Sillod

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : जनावरे पकडण्यासाठी गेलेले पोलिस व गोरक्षक यांच्या वाहनांवर अज्ञात आरोपींनी दगडफेक केली. यात गोरक्षकांच्या कारच्या समोरील काच फुटली. यानंतर दुचाकीवरून पळून जाणाऱ्या अज्ञात आरोपींचा पोलिसांनी पाठलाग केला. मात्र आरोपी दुचाकी सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.

मंगळवारी (दि. ३) ईदगाह परिसरातील एका मकाच्या शेतात कत्तलीसाठी आणलेली जनावरे बांधून ठेवलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. गुन्हे शाखा, शहर, ग्रामीण व अजिंठा पोलिस व गोरक्षक ईदगाह परिसरात गेले. यावेळी सहा जण बसलेले होते. पोलिस दिसताच आर ोपींना कारवाईची भणक लागली. त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यात गोरक्षकांच्या कारची (एमएच २०, ईजे १४७९) समोरील काच फुटली. यानंतर आरोपींनी दुचाकींवरून धूम ठोकली. मात्र पोलिसांनी पाठलाग करताच आरोपींनी दुचाकी सोडून पळ काढला.

पोलिसांनी ३३ जनावरे, ६ दुचाकी असा जवळपास १४ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी फिर्याद दिली. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे करीत आहेत. दरम्यान रात्री अपरात्री पोलिसांना चकमा देऊन कत्तलीसाठी जनावरांची वाहनात कोंबून वाहतूक केली जाते. पोलिसांवर पाळत ठेवून ही वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या.

जनावरे उंडणगावच्या गोशाळेत पाठविली

पोलिसांनी पकडलेल्या ३३ जनावरे उंडणगाव येथील गोशाळेत पाठवण्यात आली. दरम्यान अशा कारवायांवेळी पोलिस, गोरक्षकांवर हल्ला करण्याची ही पहिली घटना नाही. या कारवाईदरम्यान ही पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहून आरोपी पळून गेले. पोलिसांवर दगडफेक करण्याचे धाडस अशा आरोपींमध्ये येते कोठून ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT