लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : सावत्र बापाचा दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; जन्मदाती आईही बनली वैरीण

बुलढाण्याहून एकटीने संभाजीनगर गाठून फोडली अत्याचाराला वाचा

पुढारी वृत्तसेवा

Stepfather abuses ten-year-old girl

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जेथे माया, सुरक्षितता आणि आधार मिळायला हवा, तिथेच एक दहा वर्षांची चिमुरडी अत्याचाराच्या अंधाऱ्या गर्तेत ढकलली गेली. बुलढाणा जिल्ह्यात सावत्र पित्याच्या विकृत वासनेचा बळी ठरलेली ही बालिका जेव्हा आईकडे मदतीसाठी धावली, तेव्हा तिला सावरण्याऐ वजी आईनेच चटका दिला. या छळाला कंटाळून तिने अखेर धैर्य एकवटून एसटीने गुरुवारी (दि.१७) रात्री छत्रपती संभाजीनगर गाठले आणि वेदनेला वाचा फोडली.

चेतना (नाव काल्पनिक), तीन वर्षांपूर्वी आईसोबत विजयनगर परिसरात राहत होती. वडील विभक्त झाल्यावर आईने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील एका शेतकऱ्याशी दुसरा विवाह केला आणि तिला सावत्र बापाच्या छायेखाली घेऊन गेली. तेथे या दारूच्या आहारी गेलेल्या सावत्र बापाची तिच्यावर बाईट नजर पडली.

त्याने चेतनावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केल्यामुळे ती वाचली. तिने हा प्रकार काकूला सांगितला. त्यावर काही दिवस काकू तिला सोबत घेऊन गेली. काही दिवसांनंतर ती पुन्हा आईकडे राहायला आल्यावर सावत्र बापाने तिला शिकार बनविले. वारंवार लैंगिक अत्याचार केला. चेतनाने प्रत्येक प्रसंगी आईला सांगितले, पण मायेच्या जागी उभी असलेल्या आईने तिच्यावर विश्वास न ठेवता तिलाच शिक्षा केली, चटके दिले, पोटदुखीच्या गोळ्या खायला लावल्या आणि गप्प बसण्याचा इशारा दिला.

या छळाला कंटाळून चेतनाने गुरुवारी एकटीने एसटी बस पकडून छत्रपती संभाजीनगर गाठले. सिडको बसस्थानकावर ती रडत उभी असताना एका सजग प्रवाशाचे तिच्याकडे लक्ष गेले. तिच्या सांगण्यावरून त्याने तिला कोमल पाटील (नाव बदलेले) यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. पाटील यांनी तिची अवस्था पाहून तिला घरी बोलावून घेतले. पहाटेपर्यंत तिचे रडणे थांबले नाही. अखेर विश्वासात घेत तिने घडलेला संतापजनक प्रकार कोमल पाटील यांना सांगितला.

शिवसेनेचे जंजाळ चिमुकलीसह पोलिस आयुक्तालयात

संतापजनक प्रकार ऐकून सुन्न झालेल्या पाटील यांनी माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि उपशहरप्रमुख राजेश जंगले यांना याची माहिती दिली. सर्वांनी एकत्र येत चेतनाला थेट पोलिस आयुक्तालयात नेले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीरपणे दखल घेत, महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीने जबाब नोंदवून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शून्यने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. भरोसा सेलच्या उपनिरीक्षक ज्योती गात रात्री उशिरापर्यंत चेतनाचा जबाब नोंदवत होत्या. आता हा गुन्हा पुढील कारवाईसाठी बुलढाणा पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT