ST smart card registrations cross 2.5 lakh mark
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या स्मार्ट कार्डच्या नोंदणीच्या कामाला वेग आला असून, जिल्ह्यातील विविध केंद्रांत सुमारे २ लाख ५० हजार जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६० हजार लाभार्थ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले असून, या कार्डसाठी नोंदणी जुलै अखेरपर्यंत करण्याची मुदत दिली असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.
एसटीच्या वतीने अमृत ज्येष्ठ, ज्येष्ठ, महिलांसह इतर सवलतधारकांना स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांसह इतर ठिकाणी सुमारे २२३ एजन्सी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी कार्यरत आहेत. यापैकी शहरात विविध ठिकाणी ५४ एजन्सीच्या माध्यमांतून स्मार्ट कार्डची नोंदणी व वितरण सुरू आहे. या सर्वच केंद्रावर जिल्हाभरात सुमारे २ लाख ५० हजार जणांनी नोंदणी केली आहे. नोंदित लाभार्थ्यांपैकी ६० हजार लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वितरण केले आहे. दरम्यान नोंदणीसाठी जुलै अखेरपर्यंतची मुदत वरीष्ठ कार्यालयाने दिली आहे.
याला मुदतवाढ की अखेरची संधी याबाबत वरिष्ठ कार्यालयांकडून आलेल्या निर्णयानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार अशीही माहिती नेहूल यांनी दिली.
वितरणात दिरंगाई, लाभार्थी नाराज
दरम्यान, स्मार्ट कार्ड वितरणात अनेक ठिकाणी विलंब होत आहे. या विलंबामुळे लाभार्थी प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, वितरण प्रक्रियेला वेग द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
जुलै अखेरपर्यंत नोंदणी आवश्यक
एसटीतून सवलतीचा प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. या कार्डच्या नोंदणीसाठी जुलै अखेरपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत नोंदणी करणे गरजेचे आहे. मुदत संपल्यानंतर हे कार्ड मिळणार नाही. कार्ड नसेल तर एसटीची सवलत मिळणार नाही. दरम्यान नोंदणीची मुदत वाढवून मिळणार की, जुलैनंतर नोंदणी बंद होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.