SSC Result 2026 pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

SSC Result 2026 : दहावीच्या निकालात राज्यात संभाजीनगर विभाग तळाला

विभागात परभणी अव्वल हिंगोली शेवटच्या स्थानी : एकूण 88.41 निकाल तर 4.48 टक्क्यांनी घसरण

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या निकालातील घसरणीनंतर आता दहावीच्या निकालातही छत्रपती संभाजीनगर विभागाची मोठी पीछेहाट झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2026 च्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, विभागाचा निकाल 88.41 टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 4.48 टक्क्यांनी निकाल घसरला असून राज्यातील नऊ विभागांमध्ये यंदा संभाजीनगर विभाग थेट शेवटच्या स्थानावर राहिला.

शुक्रवारी दुपारी विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. विभागातून एकूण 1 लाख 84 हजार 940 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 लाख 63 हजार 520 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 21 हजार 420 विद्यार्थ्यांना अपयश आले.

दरम्यान परीक्षेच्या काळात काही गैरप्रकारांची प्रकरणेही समोर आली आहेत. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकरणांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या काही विषयांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. तसेच पेपर तपासणीदरम्यान आढळलेल्या काही प्रकरणांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

मुलींची पुन्हा बाजी

दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच आघाडी घेतली. विभागातील 1 लाख 2 हजार 521 मुलांपैकी 86 हजार 921 मुले उत्तीर्ण झाली असून मुलांचा निकाल 84.78 टक्के लागला. तर 82 हजार 419 मुलींपैकी 76 हजार 599 मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींचा निकाल 92.93 टक्के राहिला. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत 8.15 टक्क्यांनी अधिक नोंदवला गेला.

  • विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये परभणी जिल्ह्याने 90.02 टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला. बीड जिल्हा 89.72 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल 89.31 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तसेच जालना 85.90 टक्क्यांसह चौथ्या तर हिंगोली 83.26 टक्क्यांसह विभागात शेवटच्या स्थानावर राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT