Special training for officers and employees appointed at the last minute
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक मतदानाच्या दिवशी सीईटी परीक्षा असल्याने शिक्षक व अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे ऐनवेळी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण बुधवारी (दि. ४) सकाळी ९ वाजता सिल्लोड येथील जळगाव रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे पार पडले.
हे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय देवराये यांच्या उपस्थितीत व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कारभारी दिवेकर व रत्नाकर पगार यांच्या विशेष नियंत्रणात घेण्यात आले. या शिबिरात एकूण ७६८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर कामांसाठी आवश्यक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान हाताळणी, मतदान ईव्हीएम प्रक्रिया, मतमोजणीपूर्व तयारी याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच PPT सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंका व समस्यांचे निराकरण करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया यशस्वी, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व प्रशिक्षण घेतलेल्या तसेच नव्याने प्रशिक्षण दिलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्याची भावना ठेवून कोणतीही कुचराई न करता काम करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी केले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय देवराये तहसीलदार, सिल्लोड), रत्नाकर पगार (गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिल्लोड), कारभारी दिवेकर (मुख्याधिकारी, नगरपरिषद सिल्ल ोड), रमेश ठाकूर (गटशिक्षणाधिकारी), जुबेर सिद्दीकी (मिडिया कक्ष प्रमुख), देवेंद्र सूर्यवंशी (प्रकल्प अधिकारी) व जितेंद्र पानपाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेत व अनिवार्यपणे उपस्थित राहावे, अशा सूचना निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी दोन टप्प्यांत प्रशिक्षण
यापूर्वी नियुक्त १ हजार ४०६ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र सीईटी परीक्षा ०७फेब्रुवारी असल्याने मोठ्या प्रमाणावर अनुपस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून हे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.